बेळगाव लाईव्ह : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंटरनेट, सोशल मीडियावर असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही योजना, नोकरीची संधी, वधू वर प्रस्ताव वगैरेंच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नाही, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयातून आपल्या एका जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी उपरोक्त आवाहन केले आहे. सध्याच्या काळात सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तेंव्हा कृपया इंटरनेट, सोशल मीडियावर असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही योजना, नोकरीची संधी, विवाह विषयक प्रस्ताव वगैरेंच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. संबंधित योजना ज्याने सुरू केली आहे त्यांना भेटून पडताळून खातरजमा केल्यानंतरच गुंतवणूक करा.
‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणती शब्दावलीच कायद्यामध्ये नाही. जर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून कोणी तुम्हाला धमकावत अथवा भीती दाखवत असेल, तर तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जावे. त्या ठिकाणी आमच्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्हाला आलेल्या फोनबद्दल माहिती देऊन, तो खरा आहे की खोटा? याची शहानिशा करण्याची विनंती करावी. यासाठी 1930 हा एक पोलीस प्रशासनाचा संपर्क क्रमांक आहे.
जर एखादे वेळेस चुकून तुम्ही ऑनलाइन पैसे गुंतवणुकीला फशी पडला असाल तर तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसे केल्यास तुमचे पैसे परत तुमच्या खात्यावर जमा होतील या दृष्टीने कारवाई करणे आमच्यासाठी सोयीचे होणार आहे. याव्यतिरिक्त cybercrime.gov.in वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.
बेळगाव शहर व्याप्तीमध्ये आमचे सायबर क्राईम पोलीस स्टेशन मध्यवर्ती बस स्थानका जवळ कार्यरत आहे. तुम्हाला सायबर गुन्ह्याबद्दल जर कोणतीही शंका असल्यास या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. आमचे हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन 24 तास 12 महिने तुमच्या सेवेसाठी हजर असणार आहे, अशी माहिती बेळगाव पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली आहे.




