बेळगाव लाईव्ह : सुळगा (हिं.) येथील श्री सीमेदेव युवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील शंकर आवडण यांनी अलीकडेच हा पदभार गावातील युवा कार्यकर्त्यांकडे सोपविला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात जमा झालेला देणगीरूपी निधी देखील सुपूर्द केला. श्री सीमेदेव युवक मंडळ आणि सुनील आवडण यांच्या माध्यमातून गावाचे सौंदर्य वाढवण्यासाठी एक आदर्शवत पाऊल उचलले आहे. गावातील सर्व मंदिरे आणि स्मारकांच्या सुशोभीकरणासाठी मंडळाने तब्बल ५ लाख रुपयांची देणगी दिली असून, याबद्दल गावच्या देवस्थान पंच कमिटीतर्फे काल सुनील आवडण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सुळगा (उ.) गावातील मंदिरे आणि स्मारकांना देणगी देण्याच्या या कार्यासंदर्भात बोलताना सुनील आवडण यांनी सांगितले की, “गेली १४ वर्षे चालवत असलेल्या श्री सीमेदेव युवक मंडळामार्फत मी मोठा निधी संकलित केला आहे. माझा मित्र परिवार व्यापक असल्यामुळे एवढा मोठा निधी जमा करणे शक्य झाले. हा निधी सहल वगैरेसाठी वापरावा असे कार्यकर्त्यांचे मत होते. तथापि, त्या निधीचा गावाच्या हितासाठी चांगला विनियोग करण्याचा निर्णय मी घेतला. त्यानुसार, सदर निधीपैकी २.५ लाख रुपये मंडळासाठी ठेवून उर्वरित शिल्लक निधी श्री लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुळगा गावातील १६ मंदिरांसह छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी देण्याचा निर्णय घेतला.”
सणासुदीच्या काळात डॉल्बी वगैरेवर अवास्तव पैसे खर्च करण्याऐवजी ते पैसे गावाच्या कल्याणासाठी वापरावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानुसार, एकूण ५ लाख रुपयांचा निधी कालच देणगी स्वरूपात देण्यात आला आहे. गावच्या देवस्की पंच कमिटीने या निधीचे योग्य प्रमाणात वाटप करायचे आहे. निधी वाटप प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये आणि पारदर्शकता राहावी यासाठी देणगी वाटप प्रक्रियेत आपण देवस्की पंच कमिटीला सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मंडळांनी त्यांच्या नियोजित सुशोभीकरण कामांसाठी देवस्की पंच कमिटीकडून त्यांच्या वाट्याचे पैसे घेऊन जावे लागतील, असे आवडण यांनी स्पष्ट केले. गावातील श्री ब्रह्मलिंग मंदिराला देणगी उपलब्ध करून दिल्यामुळे देवस्की पंच कमिटीतर्फे दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर काल माझ्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, अशी माहिती सुनील आवडण यांनी दिली.
दरम्यान, गावातील मंदिरे आणि स्मारकांच्या विकासासाठी श्री सीमेदेव युवक मंडळाच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची देणगी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान पंच कमिटी सुळगा (उ.) यांच्यातर्फे सुनील शंकर आवडण यांचा काल मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री ब्रह्मलिंग मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रमही पार पडला. याप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटील, उपाध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सचिव लक्ष्मण कोवाडकर, सदस्य टोपाण्णा पाटील, यल्लाप्पा पाटील, परशराम पाटील, यल्लाप्पा देवगेकर, यल्लाप्पा कदम, नागोजी चौगुले आदींसह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
श्री सीमेदेव युवक मंडळ आणि सुनील आवडण यांच्या सहकार्याने गावातील देवस्थान पंच कमिटीने ५ लाख रुपयांच्या देणगीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे: श्री सीमेदेव मंदिर ५०,००० रुपये, श्री दुर्गादेवी मंदिर ४०,००० रुपये, श्री ब्रह्मलिंग मंदिर ४०,००० रुपये, श्री कळमेश्वर मंदिर ५०,००० रुपये, श्री विठोबा बीरदेव मंदिर २५,००० रुपये, श्री शंकर मंदिर ३५,००० रुपये, श्री गणेश मंदिर २५,००० रुपये, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३०,००० रुपये, श्री रेणुकादेवी चौथरा २५,००० रुपये, श्री बनवेश्वर मंदिर २५,००० रुपये, श्री हनुमान मंदिर मारुती गल्ली २५,००० रुपये, श्री मरगाई मंदिर ३०,००० रुपये, श्री ज्योतिर्लिंग मंदिर ४०,००० रुपये, श्री मळेकरणी मंदिर १०,००० रुपये, श्री मसनाई मंदिर १०,००० रुपये, श्री मारुती मंदिर वेंगुर्ला रोड १०,००० रुपये. याशिवाय, छ. शिवाजी महाराज पुतळा ब्रह्मलिंग गल्ली १०,००० रुपये, धर्मवीर संभाजी महाराज पुतळा १०,००० रुपये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा १०,००० रुपये. गावातील मंदिरे आणि स्मारकांना या पद्धतीने निधी उपलब्ध करून देण्याच्या या आदर्शवत कार्याचे सुळगा (उ.) गावासह पंचक्रोशीत कौतुक होत आहे.




