बेळगाव लाईव्ह : अगरबत्ती व्यवसाय प्रकरणात बेळगाव मधील अनेक महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या गंभीर घटनेनंतर, शहापूर पोलीस ठाण्याच्या उपस्थितीत फसवणूक झालेल्या महिलांची एक महत्त्वपूर्ण साई भवन येथे बैठक पार पडली.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत, पीडित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
या बैठकीत हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. या सर्व महिला शहापूर पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रारी दाखल करणार आहेत. “संबंधित भामट्याला तातडीने गजाआड करून महिलांना न्याय मिळवून द्यावा,” अशी तीव्र मागणी महिलांनी केली.
रमाकांत कोंडुस्कर यांनी सर्व पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शहापूर पोलीस निरीक्षक सिमानी स्वतः बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.




