बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या एकमेव मार्कंडेय नदीने ऑक्टोबर महिन्यातच उचगाव परिसरात तळ गाठल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने नदीतील पाणी कमी झाले आहे. त्याचबरोबर हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे, ज्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
सामान्यतः, मार्कंडेय नदी जानेवारी महिन्यापर्यंत वाहत असते आणि त्यानंतर कोरडी पडते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसच नदीने तळ गाठल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. परिणामी, नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत नदी पूर्णपणे कोरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमधून पाण्याचा उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे, ज्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी घट होत आहे. कंग्राळी आणि अलतगा परिसरात नदीला अजूनही समाधानकारक पाणी असले तरी, उचगाव, हिंडलगा, सुळगा, आंबेवाडी या भागांमध्ये पाणीपातळी खूपच खाली गेली आहे.
लघू पाटबंधारे विभागाकडून मार्कंडेय नदीवर सुळगा येथे बंधारा बांधून पाणी अडवले जाते. या बंधाऱ्यात फळ्या घालून नदीचे पाणी साठवले जाते, ज्याचा उपयोग शेतकरी शेतीसाठी करतात. यापुढे पावसाने दडी मारल्यास शेतीसाठी पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीचे पाणी अडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर पिके घेतली जातात, ज्यासाठी मार्कंडेय नदीच्या पाण्याचा वापर होतो. पाणीपातळी कमी झाल्यास पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.



यंदा भात पिकाचे तीन वेळा नुकसान झाले आहे. गणेशोत्सवापर्यंत भात रोपांची लागवड करण्यात येत होती. उशिरा लागवड केलेल्या या भात पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.




