बेळगाव लाईव्ह :गेल्या दोन वर्षांपूर्वी जवळपास 25 हजार गोवर्गीय जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लम्पीस्कीन रोगाला पायबंद घालण्यासाठी यंदा पशु संगोपन खात्याने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने या रोगाला आळा घालण्यासाठी जोरदार मोहीम उघडणाऱ्या पशु संगोपन खात्याने आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण केले आहे. जनावरांना लम्पीपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात असून एकही जनावरण लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या वगैरे जनावरांची संख्या जवळपास 13 लाख आहे. यापैकी केवळ गोवंशीय जनावरांना लम्पीस्कीन रोगाची लागण होत असून अशा जनावरांनाच रोगप्रतिबंधक लस टोचली जात आहे.
अलीकडे जिल्ह्यातील सीमावर्तीय गावांमधील जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन खात्याकडून तातडीने रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम घरोघरी जाऊन राबवण्यात येत असून त्याला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील 5 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित जनावरांना देखील लस टोचली जाणार आहे. तसेच या धोकादायक रोगाची लक्षणे दिसताच जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
लम्पीस्कीन हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्याची लागण झाल्यास जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी होण्याबरोबरच रोगाची तीव्रता वाढल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून पशु संगोपन खात्यातर्फे संबंधित रोगप्रतिबंधक लस सर्वत्र पुरवण्यात आली आहे. गत दोन वर्षात लंबी स्कीन रोगामुळे बेळगाव जिल्ह्यातील पंचवीस हजार गोवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला आहे मात्र यावेळी या रोगाची तीव्रता कमी असली तरी खबरदारी म्हणून सर्व जनावरांना लस देण्यात येत असल्याची माहिती पशु संगोपन खात्याने दिली आहे.
जनावरांचा कोणत्याही रोगाने मृत्यू झाल्यास अनुग्रह योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या मृत्यूची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. गाय, म्हैस किंवा बैलाचा मृत्यू झाल्यास 15 हजार रुपये आणि शेळ्या मेंढ्यांच्या मृत्यूसाठी 7500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. तरी पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशु संगोपन खात्याचे सहसंचालक रवी सालीगौडर यांनी केले आहे.


