बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत निपाणी सहकार क्षेत्राच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला अर्ज मागे न घेण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आमदार जोल्ले यांना आव्हान दिले असून, आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले.
शनिवारी बेळगाव डीसीसी बँकेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. उत्तम पाटील म्हणाले, “मी डीसीसी बँक निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निपाणी सहकार क्षेत्राला माझा मोठा हातभार लागलेला आहे.
” निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना ते म्हणाले, “या निवडणुकीसाठी आमचे एक मजबूत संघटन तयार आहे. वीरकुमार पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते आमच्यासोबत एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहोत.”

राजकीय पाठिंब्याबद्दल विचारले असता, पाटील यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “गेल्या लोकसभा निवडणुकीत मी प्रियांका जारकीहोळी यांच्यासाठी काम केले होते. निवडणुकीच्या वेळी परिस्थिती बदलते. मी सतीश जारकीहोळी यांचा आशीर्वाद घेतला असून, ते आमच्या सोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही.”
उत्तम पाटील यांच्या या ठाम भूमिकेमुळे, निपाणी सहकार क्षेत्रातील डीसीसी बँकेची ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार जोल्ले यांच्या विरोधात पाटील यांनी दंड थोपटल्याने, या जागेचा निकाल बेळगावच्या सहकार राजकारणाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.


