गणतीच्या आदेशात बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अजब प्रयोग

0
49
D c office
Dc office file
 belgaum

बेळगाव लाईव्ह:सरकारने सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (गणतीसाठी ) शिक्षकांना अधिकृत सुट्टीचा कालावधी वाढवून 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेला असतानाही, बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या आदेशाची पायमल्ली करत शिक्षकांवर अन्यायकारक बोजा टाकल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मौखिक आदेश देत सर्व शिक्षकांना “क्लास घ्या आणि नंतर गणतीसाठी जा” असा अजब हुकूम दिला आहे. हेडमास्तरांच्या माध्यमातून हा आदेश गूगल मीटद्वारे सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला असून, एक दिवस भाषा विषयाचे क्लासेस आणि दुसऱ्या दिवशी कोअर सब्जेक्टचे क्लासेस घ्या, असा सक्तीचा संदेश पाठवण्यात आला आहे.

फोटो पुराव्याची सक्ती!
याचबरोबर शिक्षकांना “वर्ग सुरू होण्यापूर्वी आणि वर्ग संपल्यानंतर गूगल लोकेशनसह फोटो पाठवा” असा आदेश देण्यात आला आहे. काही शिक्षकांची गणतीचे ठिकाण  शाळे पासून 7ते 8 किमी अंतरावर असली तरीही “काहीही करा पण क्लास घ्या” अशी कडक सूचना दिली गेली आहे.

 belgaum

गणतीदार की सुपरवायझर?
हायस्कूलच्या शिक्षकांना सुपरवायझर म्हणून नेमणूक करायला हवी होती, परंतु त्याऐवजी त्यांना गणतीदार म्हणून कामावर लावण्यात आले आहे. ही मोठी प्रशासकीय चूक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही एससी/एसटी गणतीच्या वेळी शहर गट शिक्षणाधिकाऱ्यानी (रवी बजंत्री ) यांनी अशीच गंभीर चूक केली होती, असा आरोप करण्यात येत आहे.

शिक्षकांचा संताप शिगेला
नवीन आदेशामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“क्लास केव्हा घ्यायचा आणि गणती केव्हा करायची?”
या गोंधळामुळे शिक्षकांना रोज फिरावे लागत असून, घराघरांत गणतीचे कामही नीट पूर्ण होत नाही आहे. शिक्षक सांगतात — “एकीकडे प्रशासन रोज नवे आदेश देत आहे आणि दुसरीकडे आम्हाला स्वतःच्या आयुष्याचा विचारही करायला वेळ नाही. एकंदर ‘मेलो तरी चालेल पण क्लास घ्या’ असा शिक्षणाधिकाऱ्यांचा दृष्टिकोन दिसत आहे.”

जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा
शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातून बेळगाव जिल्हाधिकारी श्री. रोशन यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सरकारने दिलेल्या सुट्टीच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली करत, शिक्षकांवर अन्यायकारक जबाबदाऱ्या लादल्या जात आहेत. एकीकडे शिक्षक गणतीचे काम पार पाडत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याकडून वर्ग घेण्याचा दडपणाचा आदेश देण्यात येत आहे. या अमानवी पद्धतीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी शिक्षकांची आणि शैक्षणिक संघटनांची ठाम मागणी आहे.

“शिक्षक गणती करतायत, वर्गही घेतायत, फोटोही पाठवतायत मग विश्रांती कोण देणार?” असा सवाल आता शिक्षक समाजातून ऐकू येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.