बेळगाव लाईव्ह :धार्मिक मिरवणुकीसाठी ठरलेल्या मार्गावरून न जातांना या मार्गावरून मिरवणूक गेल्याने त्यानंतर उपस्थित झालेल्या वादामुळे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात घडली आहे.
खडक गल्लीतील दगडफेक घटनेच्या ठिकाणी शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे शुक्रवारी रात्री स्वतः भेट देऊन पाहणी केली.
स्थानिकांकडून व पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर बोरसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खडक गल्लीमध्ये दोन समुदायांमध्ये वाद झाला. आज धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी ठराविक मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र काही जण त्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने आले. स्थानिकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आणि त्यातून वाद निर्माण झाला.

स्थानिकांनी दगडफेकीची तक्रार दिली आहे. ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही दुखापत झालेली नाही. दोन्ही समुदायातील ज्येष्ठांनी तात्काळ मध्यस्थी करून वाद मिटवला. मूळ मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने जाणे चुकीचे झाले, असेही त्यांनी मान्य केले.
‘आय लव्ह’ बॅनर प्रकरणाबाबत मनपाला सांगितले जाईल. परवानगी घेऊनच बॅनर लावण्याचे निर्देश दिले जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


