बेळगाव लाईव्ह : सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथे घडली आहे.
गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये भात बांधणीचे काम करत असताना विषारी सर्पाने दंश केला.
त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर शेतकऱ्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स बोलावून त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
गणपती हलसकर यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी व वयस्कर वडील असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार आज मंगळवार, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी हत्तरवाड येथे पार पडणार आहेत.स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


