बेळगाव लाईव्ह : वाल्मिकी समुदायाचे नेते सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाल्यास त्यांना आपला पाठिंबा असेल, असे मोठे विधान माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे. पक्षामध्ये जारकीहोळी यांनी खूप काम केले आहे. त्यांना संधी मिळाल्यास ते मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शहरात आज पत्रकारांशी बोलताना श्रीरामुलू यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. “नोव्हेंबर क्रांती” असे वक्तव्य करणारे तुमकूर मतदारसंघाचे आमदार राजण्णा यांचा काँग्रेस नेत्यांनी राजीनामा घेतला. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील.
खरगे यांचे पुत्र प्रियांक यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा झाली आहे. याच कारणामुळे, राज्यात ‘भारत माता की जय’ आणि ‘आरएसएस’ला पाठिंबा देणाऱ्या लोकांना काँग्रेस तुरुंगात टाकण्याचे काम करत आहे. याउलट, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस राज्यसभेचे सदस्य बनवत आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रियांका खर्गे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काँग्रेस सरकार ‘आरएसएस’ला पाठिंबा देणाऱ्या लोकांवर विनाकारण कायदेशीर कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात सध्या अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७५ मध्ये इंदिरा गांधी आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करत होत्या, अगदी त्याचप्रमाणे आज राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अघोषित आणीबाणी लागू केली आहे. हे सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे, असे त्यांनी म्हटले.
राज्यात सध्या विधान परिषद सदस्यांची मुदत संपली असून पाच सदस्यांची नियुक्ती होणे बाकी आहे. यासाठी भाजप नेते बैठक घेत आहेत. या पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजप नेते बैठक घेऊन त्याचा अहवाल राज्याध्यक्ष आणि केंद्रीय नेत्यांना सादर करतील. ते अंतिम यादी तयार करतील, असे त्यांनी सांगितले.




