बेळगाव लाईव्ह :काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा केरळ येथील भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव याला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भारतीय युवा काँग्रेसच्या बेळगाव ग्रामीण शाखेने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
काँग्रेसचे युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन नुकतेच शहर पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या गैरहजरीत पोलीस उपायुक्त एन. आर. बरमणी यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
निवेदनामध्ये राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा केरळ येथील भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव यांच्याविरुद्ध बेळगांव ग्रामीण युवा कॉंग्रेस यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंटू महादेव याला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी उचगांव ब्लॉक युवा कॉंग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील, उपाध्यक्ष निंगप्पा तल्लुरी, सुनील नाईक, नारायण काळसेकर, महेश नाईक, गोपाळ पाटील, मोहन पाटील, महेंद्र पाटील आदींसह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. केरळ मधील भाजप प्रवक्ते पिंटू यांनी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना गोळी घालून ठार मारण्याची खुलेआम धमकी दिली आहे.
त्यांच्याविरोधात आम्ही आमचे नेते मृणालदादा हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस ठाण्यामध्येसह शहराचे पोलीस उपायुक्त एन. आर. बरमणी यांना निवेदन सादर केले आहे.
जोपर्यंत पिंटू याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असे उचगांव ब्लॉक युवा कॉंग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.


