बेळगाव लाईव्ह : राज्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या मात्र मौजमजा करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी केली.
कित्तूर तालुक्यातील नेसरगी गावामध्ये आज शुक्रवारी पीकहानी पाहणी दौऱ्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारी अधिकारी देखील आत्महत्या करू लागले आहेत. राज्यातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांचे निवारण करण्याऐवजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मौजमजा करत आहेत. सोयाबीन पीक संपूर्ण नष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांचे कष्ट सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत. सोयाबीन पिकाची हानी झालेल्या भागांना भेटी देऊन पाहणी केली असून यामध्ये कोणतेही राजकारण नाही. राज्य सरकार टिकले तर त्यांनी सोयाबीन पीक हानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईचे वितरण करून केंद्र सरकारकडे मदत मागावी.
केंद्राकडे त्यांनी अनुदान द्या म्हणून मागणी केली पाहिजे होती. तथापि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यापैकी काहीच करत नसल्याबद्दल विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी नाराजी व्यक्त केली.
जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करता येत नसतील तर सिद्धरामय्या यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविण्यात कोणता पुरुषार्थ आहे. काँग्रेस सरकारने गॅरेंटीच्या नावावर जनतेला दुःख देण्याचेच काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.




