बेळगाव लाईव्ह : तिसरा रेल्वे गेट उड्डाणपूल रस्ता दुरुस्त करावा यासाठी अनेक सत्याग्रह आंदोलने झाली मात्र अद्याप प्रशासनाने आता दुरुस्त केला नाही आगामी काही दिवसात या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले मात्र तोवर नादुरुस्त असलेल्या रस्त्याचे काय यासाठी चक्क ट्रॅफिक पोलिसांनीच पुढाकार घेतला असून रहदारी पोलिसांनी रस्त्यावरचे धोकादायक खड्डे बुजवले आहेत.
रस्त्यावरील खड्डे आणि त्यातच पावसाच्या सरी यामुळे तिसऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता खूपच खराब झाला आहे. वारंवार सांगूनही संबंधितांकडून तो दुरूस्त होत नसल्यामुळे रहदारी पोलिसांनीच खड्ड्यात दगड टाकून तो बुजवला. तिसऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. या खड्ड्यांमध्ये पेव्हर्स घातले होते. परंतु, ते फुटून पुन्हा खड्डे उघडे पडलेआहेत.
रात्रीच्यावेळी येथून जाताना अपघाताची शक्यता अधिक असते. ही बाब वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम यांच्या लक्षात आली. त्यांनी तिघा वाहतूक पोलिसांना घेऊन येथील रस्त्यावरील खड्डे बुजवले.

जेणेकरून येथून जाणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागू नये. खड्ड्याबाबत महापालिका व बांधकाम खात्याला वारंवार सांगूनही ते दुरूस्त होत नसल्याची खंत वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत रस्ता दुरुस्त करावा यासाठी अनेक आंदोलने केली होती. या रस्त्यासाठी टेंडर काढण्यात आला असून लवकरच काम देखील सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यापूर्वी पोलिसांनी धोकादायक खड्डे बुजवल्याने त्यांच्याही कामाचे कौतुक होत आहे.


