बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरानजीकच्या पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 120 वा पुण्यतिथी उत्सव सोहळा कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज महाप्रसादास अन्य कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने पार पडत आहे.
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवाला हजेरी लावणाऱ्या शेकडो भाविकांमुळे आज शुक्रवारी पंत बाळेकुंद्री गाव गर्दीने फुलून गेले होते. पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला गेल्या बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला.
त्यानंतर काल गुरुवारी पहाटे श्री पुण्यस्मरण कार्यक्रम झाल्यानंतर गावातील पंतवाड्यातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शेकडो भाविकांचा सहभाग असणारी या लक्षवेधी मिरवणुकीची सांगता दुपारी आमराईतील श्री पंतस्थानी झाली. त्यानंतर रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत पालखी सेवेचा कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाने पार पडला. यात्रेच्या स्वरूपात साजरा होत असलेल्या या पुण्यतिथी उत्सवाच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या विविध स्टॉल्सच्या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी उडाल्याचे पहावयास मिळत होती.
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर पुण्यतिथी उत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा पंत बाळेकुंद्री गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये हजारो भाविकांनी लाभ घेतला.
त्यानंतर प्रेमानंद टिपरी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम समाप्त होताच सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी अमराईतील पुण्यस्थानी जाऊन रात्री गावातील श्रीपंत वाड्यात पोहोचल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.




