बेळगाव लाईव्ह खानापूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
🔹 सावरगाळीतील मोठी चोरी
सावरगाळी येथील नारायण कृष्णा भेकणे यांनी रविवारी रात्री आपले घर बंद करून बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून त्यातील रोकड व दागिने चोरट्यांनी लंपास केले.
घरातील कपाटे, कपडे, कागदपत्रे यांची उधळण करून ठेवली असून घरात संपूर्ण पसारा दिसत आहे.
याच गावातील बाळू घाडी यांच्या घरातही चोरी झाली असून किती माल गेलेला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
🔹 गुंजीत चार घरे फोडली
गुंजी येथील देवाप्पा नेरसेकर, मल्लू झपाटे, नामदेव पाटील आणि तुकाराम घाडी यांच्या घरांचे कुलूप चोरट्यांनी तोडले. या घरांमधील मोठा ऐवज गेल्याची शक्यता कमी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
🔹 शिंपेवाडीमध्ये तीन घरांवर धाड
शिंपेवाडी गावात सचिन कांग्राळकर यांच्या तीन मजली घराचे कुलूप फोडण्यात आले आहे. घरातील किती ऐवज लंपास झाला आहे याचा तपास सुरू आहे.
तसेच बबन पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याचे आणि कृष्णा पाटील यांच्या घराचे दरवाजे देखील तोडण्यात आले आहेत.
काही कुटुंबे बाहेरगावी गेली असल्याने त्यांच्या परतल्यानंतरच चोरी झालेल्या मालाचा अचूक अंदाज लागू शकणार आहे.
🔹 पोलिसांची तपास मोहीम सुरू
सदर घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एस. बदामी यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
तपासासाठी बेळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसराचा तपास घेतला असला तरी अद्याप चोरांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
या सर्व घटनांची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
एका रात्रीत तीन गावांतील नऊ घरे फोडल्याने परिसरात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी व चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.





