बेळगाव लाईव्ह : बेळगावचे ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक नेताजी नारायणराव जाधव यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त इस्लामपूरचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील बेळगावात येणार आहेत.
गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रेल्वे ओव्हरब्रिजजवळील इंद्रप्रस्थनगर येथील मराठा मंदिरात नेताजी जाधव यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि दि बेळगाव बेकर्स को-ऑप. सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी हांगीरकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तुकाराम को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे भूषवणार आहेत.

बेळगावच्या मराठा समाज, सहकार, पत्रकारिता आणि राजकारण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे नेताजी जाधव हे आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, या वेळी बेळगावातील मान्यवर आणि मराठा समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.



