बेळगाव लाईव्ह : पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी, तसेच उसाला योग्य आधारभूत किंमत जाहीर करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेनेने शनिवारी आंदोलन केले. या आंदोलनातून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव विमानतळावरून स्मार्ट सिटीने बांधलेल्या नवीन बसस्थानकाची पाहणी करून बिम्स् सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी निघालेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन पाहिल्यानंतर, कारमध्ये बसल्याबसल्याच हाताने इशारा करत तिथून प्रस्थान केले.
अतिवृष्टीमुळे धान्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर, कापूस, बटाटा आणि ऊस या पिकांचे उत्तर कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रति एकर ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
बँका आणि वित्तीय संस्थांकडून होणारा त्रास, जप्तीची प्रक्रिया अमानवी आहे. शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत असताना, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी चक्क वानर (माकड) देखील हजर होते. शेतकऱ्यांची घोषणाबाजी ऐकत ते गप्पपणे बसून होते. तेथे उपस्थित असलेल्या एका पोलिसाची नजर त्या वानरावर पडली आणि त्याला दया येऊन त्या पोलिसाने वानराला केळी आणि पाणी खायला दिले. मात्र या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त झाली.



