बेळगाव लाईव्ह : भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी देशातील राज्यांची भाषावार पुनर्रचना झाली. याच दिवशी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार, पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव, कारवार आणि हैदराबादमधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश अन्यायकारक पद्धतीने तत्कालीन म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आले.
मराठी भाषिकांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. या संघर्षात १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगावात गोळीबार होऊन चौघांना, तसेच निपाणीत कमळाबाई मोहिते यांना हौतात्म्य प्राप्त झाले.
त्यानंतर झालेल्या सत्याग्रहात हजारो सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला. केंद्र सरकारच्या या अन्यायाच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमा भागात ‘काळा दिन’ पाळण्यात आला. त्या दिवसापासून आजतागायत दरवर्षी १ नोव्हेंबरला केंद्र सरकारविरुद्ध काळा दिवस पाळण्याची ही परंपरा सीमा भागात अखंडितपणे चालू आहे.
१ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागात काळ्या दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बेळगावमध्ये सायकल फेरी आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल फेरीची सुरुवात संभाजी उद्यान येथून सकाळी ९:३० वाजता होणार आहे.
ही सायकल फेरी नेहमीच्या मार्गाने फिरून मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे जाहीर सभेने कार्यक्रमाची सांगता करेल. बेळगाव शहर व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या कार्यक्रमात बेळगाव व बेळगाव तालुक्यातील जनता, समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवाहन
काळा दिन व कडकडीत हरताळ
१ नोव्हेंबर हा सीमाभागमध्ये मराठी भाषिक काळा दिन म्हणून गेली ६९ वर्षे पाळत आहेत. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग राज्य पुनर्रचनेवेळी केंद्र सरकारने अन्यायाने त्यावेळच्या म्हौसूर व आताच्या कर्नाटक राज्यामध्ये डांबण्यात आला आहे. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हा दिवस काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळत असतात.या दिवशी बेळगाव मध्ये मराठी भाषिक काळे वस्त्र परिधान करून मूक सायकल फेरी काढतात.
सीमाभागातील मराठी भाषिकांना केंद्र सरकारने अद्याप न्याय न दिल्यामुळे, येणाऱ्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी काळा दिन व कडकडीत हरताळ गांभीर्याने पाळण्यात येणार आहे.
यादिवशी बेळगाव इथून ही मूक सायकल फेरी निघणार असून व या दिवशी मराठी भाषिक सीमाभागातील आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हारताळ पाळावा.१ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मवीर संभाजी उद्यान येथून सकाळी ठीक ९.३० वाजता या मूक सायकल फेरीला सुरुवात होणार आहे.
बेळगाव शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघून मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. तरी सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी माजी लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अँड एम जी पाटील, कार्याध्यक्ष आर एम चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील, आदींनी केले आहे.





