belgaum

‘काळा दिन’ पाळण्यापूर्वीच आवाज दाबण्याचा प्रयत्न

0
48
 belgaum

बेळगाव लाईव्ह : येत्या १ नोव्हेंबर रोजीच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव शहरात मराठी कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा पोलिसांकडून दडपशाही सुरू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आणि मनोहर किनेकर या तिघांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत. शांततेत ‘काळा दिन’ पाळण्याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने मराठी समाजात आणि संघटनांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.

ही नोटीस मार्केट पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दाखल केलेल्या अहवालावरून देण्यात आली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की हे तिघे मध्यवर्ती समितीचे नेते धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल रॅली काढून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याआधी २०२३-२४ मध्येही अशा प्रकारे रॅली काढल्याचा उल्लेख पोलिसांनी केला आहे.

 belgaum

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम कलम १२६ नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि दोन जामीनदारांची हमी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सोमवारी या तिन्ही मराठी नेत्यांनी, सोबत एम. जी. पाटील, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिन’ शांततेत पाळण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच सायंकाळी पोलिसांनी या तिघांनाच प्रतिबंधात्मक नोटीसा पाठवल्या, यामुळे मराठी संघटनांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, “मराठी जनतेला दडपण्यासाठी प्रत्येक वर्षी राज्योत्सवाच्या आधी अशा प्रकारच्या नोटीसा देऊन धमकावण्याचे काम केले जाते. आम्ही नेहमी शांततेत आंदोलन केले आहे, तरीही पोलीस प्रशासन मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बेळगावात मराठी विरुद्ध कन्नड तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, मराठी संघटनांनी या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.