बेळगाव लाईव्ह : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात रस्त्यावरून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका महिलेसह एक वृद्ध असे 2 पादचारी जागीच ठार झाल्याची घटना रामनगर -धारवाड मार्गावर कुंभार्डा (ता. खानापूर) गावाजवळ आज गुरुवारी पहाटे घडली.
अपघातात ठार झालेल्यांची नावे सीमा अमर हळणकर (वय 24) आणि रवळू भरमानी चौधरी (वय 65, दोघेही रा. कुंभार्डा) अशी आहेत. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की सीमा हळणकर या नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचप्रमाणे रवळू चौधरी हे आपल्या शेताकडे जात होते.
त्यावेळी कुंभार्डा गावापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर रामनगर धारवाड मार्गावर पायी जात असलेल्या या दोघांना मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की सीमा आणि रवळू हे दोघेही रस्त्याकडेला फेकले जाऊन जागीच गतप्राण झाली.
अपघात घडतात अज्ञात वाहन चालक वाहनासह फरारी झाला त्यानंतर ग्रामस्थांकडून अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच निधन पावलेल्या सीमा व रवळू यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखान्यात धाडले.
याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस फरारी वाहन चालकाचा शोध घेत आहे. दरम्यान आज दसरा सणादिवशी सीमा हळणकर व रवळू चौधरी यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे कुंभार्डा गावात हळहळ व्यक्त होत आहे.


