बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरा लगतच्या केदारवाडी अर्थात खादरवाडी गावातील वैशिष्ट्यपूर्ण दसरा उत्सवाला मोठ्या भक्तीभावाने प्रचंड उत्साहात प्रारंभ झाला असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दसरा सणानिमित्त मुख्य ग्रामदैवत श्री ब्रह्मलींग मंदिरमध्ये राहून कांही भक्तांनी अखंड उपवासाचे व्रत सुरू केले आहे. तसेच आज पहाटे 2 वाजल्यापासून गावातील मंदिराचे पुजारी व सेवेकऱ्यांकडून रांगोळी घालण्याचा कार्यक्रम सुरू होता.
यावेळी मंदिरा आवारात श्री शिवशंकर, श्री गजानन, श्री गुरुदेव दत्त, श्री काली माता व श्री हनुमान वगैरे देवी देवतांच्या भव्य अशा लक्षवेधी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. मंदिरामध्ये आज पहाटे 4 वाजता वाजता काकड आरती आणि पूजा पार पडली. त्यानंतर ठीक 5 वाजता गावातील भजनी मंडळाकडून भजनाला प्रारंभ झाला.
भजन झाल्यानंतर ठीक 6 वाजता खादरवाडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून दुर्गा माता दौडला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली ही दौड साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
श्री ब्रह्मलींग मंदिरात गावातील युवक आणि युवतींकडून श्री ज्ञानेश्वरी वाचन झाल्यानंतर सकाळी ठीक 10 वाजल्यापासून दर्शनाचा आणि तेल वाढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता संध्याकाळी 6 नंतर परत भजनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर ठीक 7 वाजता विविध फळे व मिठाईपासून शिवलिंगाची आरास केली जाणार आहे.
हे सर्व झाल्यानंतर रात्री 9 वाजता मंदिरामध्ये गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. सदर 11 दिवस चालणाऱ्या गाऱ्हाणे घालण्याच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे याप्रसंगी संपूर्ण गाव श्री ब्रम्हलिंग मंदिरामध्ये उपस्थित असतो. पूर्वी ज्यावेळी गावची जमीन विकली गेली होती, ती जमीन परत रयतेला मिळावी म्हणून हे विशेष आणि ऐतिहासिक गाऱ्हाणे गावच्या हितार्थ घालण्यात येते.
दरम्यान उद्या दसरा सणादिवशी संध्याकाळी मंदिरमधून पालखी सोहळा निघणार आहे. पालखी मिरवणुकीला प्रारंभ होताच मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने मागणी नुसार हजारो नारळ उडविले जातात. तसेच या पालखीचे मजगावच्या श्री ब्रह्मलींग मंदिरच्या पालखीला भेटून गावामध्ये आगमन झालेल्यानंतर अप्तागिरी सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.
पालखी मिरवणुकीत गावातील सर्व युवती आणि महिला हातात आरती धरून सहभागी झालेल्या असतात. या आरतीला विशेष महत्त्व असल्यामुळे जवळपास गावातील 400 ते 500 मुलीचा पालखी मिरवणुकीत सहभाग असतो. या पालखीसोबत या सर्व मुली मंदिरमध्ये आल्यानंतर परत मंदिरामध्ये लोटांगण घालण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडतो.
हा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री भजन कीर्तन प्रवचन असे पारंपरिक कार्यक्रम ठेऊन पूर्ण रात्र जागरण केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता श्री ब्रह्मलींग मूर्ती ही तिच्या विशेष ठिकाणी विराजमान केल्यानंतर या दसरा सणाची सांगता होते.




