बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) हुक्केरी मतदारसंघातील निवडणुकीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने आज (शनिवार) दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, ही निवडणूक नियोजितप्रमाणे 19 ऑक्टोबर रोजीच पार पडणार आहे. या निकालामुळे माजी खासदार रमेश कत्ती यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही निवडणूक आधी हायकोर्टाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली होती. भीमसेन बागी यांनी मतदार यादित आपले नाव समाविष्ट न केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत मतदानावर तात्पुरती स्थगिती दिली होती.
या आदेशाविरोधात रमेश कत्ती यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची पुन्हा सुनावणी करताना, न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ही निवडणूक विशेष बाब म्हणून घेत, नियोजित तारखेलाच म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्याचा आदेश दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण निवडणुकीअंतर्गत हुक्केरी तालुक्यातील विविध प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या प्रतिनिधी मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
मात्र, हायकोर्टाच्या आजच्या आदेशानंतर आता रविवारीच मतदान होणार आहे.या निर्णयाची माहिती समजताच रमेश कत्ती यांच्या मूळगावी बेल्लद बागेवाडी येथे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.




