बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील काकती ग्रामपंचायत सदस्यांनी आज करवाढीविरोधात तीव्र भूमिका घेत निवडलेल्या प्रतिनिधींच्या मागणीचा सरकारने विचार न केल्यास सर्व सदस्य सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा काकती ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
या गंभीर मागणीसाठी काकती ग्रामपंचायत सदस्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याला निवेदन सादर केले.
काकती गाव राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याच्या कारणावरून मालमत्ता करात मोठी वाढ करण्यात आली आहे. या अन्यायकारक वाढीमुळे गरीब जनता आणि शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हणे यांनी यावर आक्रमक भूमिका घेत, “ही कर वाढ त्वरित कमी करण्यात आली नाही, तर आम्ही सर्व सदस्य एकत्रितपणे राजीनामा देऊ,” असा निर्वाणीचा इशारा दिला.
काकती गावात प्रामुख्याने शेतकरी वर्ग वास्तव्यास आहे. तरीही, यावर्षी करात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. “कराची वाढ वैज्ञानिक निकषांवर आधारित असायला हवी. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष अखंडितपणे सुरू राहील,” अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.
यावेळी लक्ष्मण पाटील, बी.टी. टुमरी, बी.जे. हिरेमठ, मारुती कंग्राळकर, मल्लप्पा गोमनाचे, सिद्धप्पा टुमरी, जी.एस. शिवपूजीमठ, महेश रंगायी, ज्योती गवी यांच्यासह अन्य सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.




