बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी असहाय्य वर्तन करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (बी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हलगा येथील यल्लप्पा भीमप्पा येशूचे (वय ५८), मार्केट पोलीस ठाण्यांतर्गत सेंट्रल बस स्थानकाजवळ मेहबूब बाबासाहेब देसाई (वय ५४) आणि शिवाजी नगर, १ ला क्रॉस येथे शहबाज दस्तगीर बोजगार (वय ५४), काकती पोलीस ठाण्यांतर्गत रसोयी ढाब्याजवळ तस्वीर महंमदहनीप सनदी (वय ३३, रा. होनगा) यांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात पीरनवाडीतील शंकर सुरेश दंडगल (वय ३३), श्रीधर दुर्गप्पा कलगुटगी (वय २१) आणि विशाल सत्यप्पा मंजनलकर (वय २२) तसेच मच्छे येथील गजानन मधु यळ्ळूरकर (वय २४) यांचा समावेश आहे.
या यशस्वी कारवाईत पीएसआय बी. के. मिटगार, पीएसआय विठ्ठल हावन्नवर, पीएसआय मृत्युंजय मठाद, पीआय नागणागौडा कट्टीमनीगौडर आणि पीएसआय लक्कप्पा जोडट्टी यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
अटक केलेल्या सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी ही मोहीम राबवणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.


