बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते शुभम शेळके यांना जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, माळमारुती पोलीस स्थानकाच्या शिफारशीवरून बेळगाव कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्तांनी तब्बल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे.
शुभम शेळके हे वारंवार पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करत आहेत आणि त्यांच्यावर शहराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये १९ गुन्हे दाखल आहेत, तसेच ते दोन भाषिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, असा जावईशोध एकतर्फी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने या नोटीसमध्ये काढला आहे.
यापूर्वी २६ मार्च २०२५ रोजी शुभम शेळके यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर, मराठी भाषिक आणि म.ए.स. विरोधात कन्नड वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने गरळ ओकल्यावर, त्याला प्रत्युत्तर म्हणून शेळके यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून निषेध नोंदवला होता. यावरूनच माळमारुती पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून पोलिसांनी दिलेल्या या ‘तुघलकी’ दंडाच्या नोटीसला वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती म.ए.स.चे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनाही प्रशासनाने पाच लाखांची प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे. या नेत्यांच्या नोटीसलाही वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना, ‘गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने केलेला भाषिक अत्याचार नवा नाही, पण आता नेत्यांना व युवकांना आर्थिक भुर्दंडात अडकवण्याचा हा कुटील डाव आहे,’ अशी टीका म.ए.स.च्या वतीने करण्यात आली आहे.
या सर्व गोष्टींना म.ए.स.च्या वकिलांमार्फत न्यायदेवतेच्या मंदिरात योग्य उत्तर देण्यात येईल. कोणत्याही दबावाला मराठी माणूस बळी पडणार नाही, ‘आपला लढा लढायचा आणि जिंकायचाच’ असे आवाहन शुभम शेळके यांनी यावेळी केले. यासाठी येत्या १ नोव्हेंबरला ‘काळा दिन’ पाळण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेळके यांनी केले.
यावेळी ॲड. बाळासाहेब कागणकार, ॲड. एम.बी. बोन्द्रे, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजित चौधरी, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, यल्लाप्पा शिंदे, शांताराम होसुरकर आदी उपस्थित होते.


