बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे खानापूर तालुक्यातील जंगल लगतच्या अनेक गावांतील गोर गरीब शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. विशेषता जंगल लगतच्या गावात कधी वन्य जीवांचा माणसावर हल्ला तर कधी पिकांचे नुकसान अश्या घटना सुरूच असून वन खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
खानापूर तालुक्यातील जंगली परिसरात प्रचंड कष्ट करून पिकवलेली शेती, हत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या वावर असल्याने मोठे नुकसान होत आहे.या भागातील शेतकरी दरवर्षी वनविभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत आहेत; मात्र अधिकारी काणाडोळा करत असल्याने शेतकऱ्यांची समस्या वाढली आहे.
शेतीलाच आपल्या जीवनाचा आधार मानणाऱ्या शेतकऱ्यांना होत असलेल्या पिकनाशामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकजण कर्जाच्या विळख्यात अडकत असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाढू लागली आहे.
मागील पंधरवड्यापासून मास्केनट्टी, भूरणकी, करिकट्टी, गस्टोळी आदी गावांमध्ये हत्तींचा कळप थैमान घालत आहे. दररोज पिकांची नासधूस सुरू असून हत्ती आता लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहेत.
शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी मास्केनहट्टी गावच्या परिसरात आलेल्या या हत्तीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावानजीक असलेल्या शेतवडीत हत्तीने ठाण मांडले आहे. हत्तीला हाकलण्यासाठी नागरिकांनी स्वतः प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र वनाधिकारींनी अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी, आमदार व वनमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.


