बेळगाव लाईव्ह विशेष 2 :जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
:२ – उत्सव, व्यसन आणि राजकीय गुलामगिरी: मराठा युवा भरकटतोय कुठे?
एकेकाळी बुद्धिमत्ता, कष्ट आणि उद्योजकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव परिसरातील मराठा समाजाची आजची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव शहर, आसपासची गावे आणि खानापूरसह मराठी भाषिक भागातील तरुणाई अत्यंत महत्त्वाच्या वेळी आपले भवितव्य धोक्यात आणत आहे. या समाजातील युवा पिढी आज जबाबदारी, मेहनत आणि कष्टापासून दूर पळत आहे. या अधोगतीला वाढते व्यसन, अनावश्यक उपक्रम आणि चुकीच्या राजकीय नेतृत्वामागील निष्ठा जबाबदार आहे.
बेळगाव परिसरातील तरुण वर्ग जवळपास वर्षभर उत्सवांच्या आणि करमणुकीच्या चक्रात अडकला आहे. आयपीएलचे दोन महिने ‘माझी बंगळूर’, ‘माझी मुंबई’, ‘माझा धोनी’, ‘माझा विराट कोहली’ याच्यात तरुण गुंततो; त्यानंतर मित्रांचे लग्न, बारसे, वरात यामध्ये वेळ जातो. यानंतर गणेश चतुर्थीचे पंधरा-वीस दिवस, नवरात्रीचा दांडिया धिंगाणा, दिवाळीचे आठ दिवस, गावोगावी आवडत्या नेत्यांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स आणि महालक्ष्मी तसेच आसपासच्या इतर यात्रांमध्ये आपला वेळ खर्ची घालतो. हे सर्व पुरेसे नसून, कोंबड्या-बकरी खाणे, दारू-बीअरच्या पार्ट्या आणि विविध व्यसनांमध्ये मराठा तरुण अधिक गुंतलेला दिसत आहे.

मोबाईलमध्ये रील्स बनवणे, पब्जी ) खेळणे यात तरुणाईचा बहुमोल वेळ वाया जात आहे. अभ्यासाची आवड तर मुळातच नाही. स्पर्धा परीक्षांशी काही देणंघेणं नाही. शेती करण्याची तयारी कोणालाच नाही. मग हा समाज पुढे जाणार कसा? एक काळ असा होता की, बेळगावमधील उद्यमबाग, भाजी मार्केट, मार्केट यार्ड किंवा एकूणच व्यापारी वर्गावर मराठी भाषिक समाजाचे वर्चस्व होते; परंतु सोन्याचा धूर निघणाऱ्या बेळगावमधून आज गांजा आणि दारूचा धूर निघत आहे, हे मराठा समाजाचे मोठे दुर्दैव आहे.
मराठा समाजाच्या अधोगतीला दुसरे मोठे कारण म्हणजे राजकीय नेत्यांच्या पाठीमागे लागून आपला तरुण वर्ग पूर्णतः बेरोजगार आणि बेजबाबदार झाला आहे. समाजाचे नेतृत्व करणारा व्यक्ती फक्त स्वतःचा खिसा भरून घेत आहे आणि त्याच्या मागे फिरणारी आपली युवा पिढी कोणतेही कामधंदा न करता दिवसभर त्याच्यामागे फिरत आहे. नेतृत्व कोणाच्या हाती द्यावे, हे समाजाने सर्वप्रथम ठरविले पाहिजे.
आजही शिक्षणात मराठा समाज खूप मागासलेला आहे. देश आणि जागतिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत, याच्याशी समाजाचा संपर्क तुटलेला आहे. इतर समाजातील मुले-मुली शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात खूप पुढे जात असताना, आपला मराठा समाज मात्र रुढी, परंपरा जपण्याच्या नादात रस्ता भरकटत चालला आहे, हीच खरी शोकांतिका आहे. सण, उत्सव, यात्रा, जयंत्या यांमध्ये आपला बहुमोल वेळ खर्च करून, ढोल-नगारे, झांज पथक, दांडिया यांसारख्या गोष्टींमध्ये तरुण-तरुणी व्यस्त होत आहेत, तर इतर समाज बघ्याची भूमिका घेऊन आपल्या कामाला लागतो. यामुळे मराठा तरुण-तरुणी शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपले भविष्य बिघडवत आहेत, ही ज्वलंत समस्या आहे.










या गंभीर स्थितीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व राजकीय पक्षांतील मराठी प्रमुखांनी एकत्र येऊन या विषयावर विचारविनिमय करणे आणि मराठा समाजाला जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या युवा पिढीला शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. या विधायक कार्यासाठी आणि मराठा समाजाला आता तरी जागे होण्यासाठी हे प्रबोधन खूप गरजेचे आहे. समाज जागृत झाल्याशिवाय, सुशिक्षित झाल्याशिवाय आणि राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडल्याशिवाय मराठा समाज पुन्हा प्रगतीच्या वाटेवर जाणार नाही, हे निश्चित!
क्रमशः



