बेळगाव लाईव्ह : शनिवारी बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांकडून पाळला जाणारा काळा दिवस आणि त्याच दिवशी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (IAS) यांनी महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांवर प्रवेशबंदीचा आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार आणि सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे संजय पोवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांच्यासह MES आणि शिवसेना कार्यकर्त्यांना १ नोव्हेंबर २०२५ रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्योत्सव दिनी हे नेते निपाणी मार्गे बेळगावात येऊन “काळा दिवस” पाळण्याचा इशारा दिल्याने, संभाव्य तणाव आणि गोंधळ टाळण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जारी करण्यात आला असून, पोलिस आयुक्त, बेळगाव शहर आणि पोलीस अधीक्षक, बेळगाव जिल्हा यांना तो अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, मागील वर्षी देखील जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अशाच प्रकारचा प्रवेशबंदीचा आदेश जारी केला होता. यंदाही तसाच आदेश पुनश्च लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, विजय देवणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बेळगावात येऊन “काळा दिवस” पाळण्याचा इशारा दिला होता. मागील वर्षी त्यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवर आंदोलनही केले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना बेळगाव प्रवेशबंदीचा आदेश लागू केला आहे.



