जागा हो मराठा!…शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि जीवनशैलीतील आव्हानांवर विशेष लेखमालिका
बेळगाव लाईव्ह विशेष 7: बेळगावच्या मराठा समाजाची प्रगती खुंटण्यामागे अनेक अनिष्ट चालीरीती आणि रूढी कारणीभूत ठरत आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करताना, जुन्या आणि निरर्थक रूढी-परंपरांना चिकटून राहणे समाजाला अधोगतीकडे नेत आहे. ‘आहेर’ देण्याची प्रथा आणि ‘अन्ननासाडी’ या दोन मोठ्या समस्यांनी समाजाचे आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडवले आहे. या दोन्ही गोष्टींवर तातडीने निर्बंध घालणे, ही आजच्या मराठा समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
मराठा समाजात बारसे, लग्न, गृहप्रवेश, यात्रा, उत्सव यासह अनेक कार्यक्रमांमध्ये आहेर देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात पाळली जाते. गरिबातील गरीब कुटुंबापासून ते उच्चभ्रू कुटुंबांपर्यंत ही स्पर्धा सुरू असते. कित्येक कार्यक्रमांमध्ये केवळ आहेराच्या प्रथेमुळे आर्थिक नियोजन कोलमडते. इतरांचा आदर्श घेऊन किंवा इतरांकडे पाहून अनेकदा आर्थिक नियोजन नसतानाही, गरीब आणि होतकरू कुटुंबांना या प्रथा पाळाव्या लागतात. मात्र, अशा प्रथामुळे गरीब अधिक गरिबीकडे ढकलला जातो, कर्जाचा डोंगर वाढतो आणि यातून कौटुंबिक समस्या, आर्थिक तणाव आणि नैराश्य यासारखी अनेक आव्हाने उभी राहतात.
याच आहेराच्या मुद्द्यावरून सोयरीक थांबते, नात्यांमध्ये दुरावा येतो, किंवा नाती तुटतात. पूर्वीच्या काळात लोक फार वर्षांनी एकमेकांना भेटायचे, तेव्हा आहेर-माहेर करणे गरजेचे असायचे. पण, आताच्या काळात फोन आणि सोशल मीडियामुळे सर्वजण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे दरवेळी येणाऱ्या माणसांना मोठे आहेर करणे किंवा मोठमोठ्या भेटवस्तू देणे पूर्वीसारखे गरजेचे राहिलेले नाही.
त्याऐवजी, जर कोणाला आहेर करायचा असेल किंवा मदत करायची असेल, तर भेटवस्तू देण्याऐवजी रोख स्वरूपात मदत केल्यास, ती त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी उत्तम ठरू शकते. तसेच, ज्यांचा काही उपयोग नाही अशा नको असलेल्या वस्तूंचा साठा घरात होणेही टळेल.

आहेरासोबतच अन्नाची नासाडी हा मराठा समाजात अलीकडे रूढ होत चाललेला एक मोठा दुर्गुण आहे. बेळगावमधील अनेक भागांमध्ये हा प्रकार सर्रास दिसून येतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रक्षाविसर्जन विधी दरम्यानही मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. स्मशानभूमीत अन्नाचा ढिगारा जमा होतो आणि अखेरीस तो कचराकुंडीत जातो.
एकीकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले अनेक जण आपल्या निदर्शनात येतात आणि दुसरीकडे मृत व्यक्तीच्या पश्चात केवळ रितीरिवाज या नावावर अन्नाची नासाडी करणे, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. विधीपूर्वक ज्या गोष्टी आहेत, त्या करून बाकीच्या गोष्टींना फाटा देऊन होणारी अन्नाची नासाडी टाळणे, यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मेट्रो सिटीमध्ये अशा प्रकारांना आळा घालण्यात आला असून, तेथील नागरिकांनी बदल स्वीकारला आहे. हीच गरज आता बेळगावमधील मराठा समाजाला आहे.
केवळ रक्षाविसर्जन विधीच नाही, तर मृत कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी अन्न घेऊन जाण्याची प्रथा देखील मोठ्या अन्ननासाडीस कारणीभूत ठरते. दिवस कार्य होईपर्यंत सलग अकरा दिवस पै-पाहुणे, शेजारीपाजारी यांच्याकडून ढीगभर अन्न मृत कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी दिले जाते.
इतक्या मोठ्या प्रमाणात जमा होणारे हे अन्न अखेर कचराकुंडीत जाते. याऐवजी, मृत कुटुंबीयांच्या घरी जाताना अन्नपदार्थ घेऊन न जाता, त्या कुटुंबाला उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतल्यास, तो संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या ‘एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ’ यानुसार समाजाच्या उद्धारासाठी उपयुक्त ठरेल.
क्रमशः



