बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत लिंगायत समाजाचाच अध्यक्ष होणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी माजी खासदार रमेश कत्ती यांच्यावर निशाणा साधला. कत्ती यांनी केलेल्या ‘अश्वमेधाचा घोडा कुणी बांधला तरी काही फरक पडणार नाही’ या वक्तव्याचा संदर्भ घेत जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. बेळगाव डिसिसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी गटाच्या सदस्यांनी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
जारकीहोळी गटाने चिक्कोडीसह एकूण तीन जागा वगळता उर्वरित १३ जागांसाठी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये निपाणी तालुक्याच्या जागेसाठी अण्णासाहेब जोल्ले, बैलाहोंगलसाठी महांतेश दोड्डगौडर, खानापूरसाठी अरविंद पाटील, सवदत्तीसाठी विरुपाक्ष मामनी, येरगट्टीमधून विश्वास वैद्य, बैलाहोंगलमधून विक्रम इनामदार आणि रायबागसाठी अप्पासाहेब कुलुगुडे यांचा समावेश होता. मात्र, बेळगावच्या उमेदवाराचे नाव अजून निश्चित झालेले नाही. दिनांक ११ रोजी सर्व काही स्पष्ट होईल, अशी माहिती भालचंद्र जारकीहोळी यांनी माध्यमांना दिली.
डिसिसी बँकेच्या निवडणुकीला ‘जारकीहोळी विरुद्ध कत्ती’ असे स्वरूप देणे योग्य नसल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. “हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाची निवडणूक एका तालुक्यापुरती मर्यादित होती, पण डिसिसीची निवडणूक संपूर्ण जिल्ह्याशी संबंधित आहे. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण चालत नाही,” असे त्यांनी नमूद केले. रमेश कत्ती यांची अपेक्षा फोल ठरणार असून लिंगायत समाजातीलच उमेदवार अध्यक्ष होतील, असा ठाम दावा त्यांनी केला.

या निवडणुकीत आमदार आणि माजी आमदार उतरण्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, “या संचालक पदासाठी टीए-डीए (प्रवास भत्ता) वगळता कोणतेही मोठे विशेष लाभ मिळत नाहीत. मात्र, डिसिसी बँक संचालक म्हणून निवड झाल्यास पुढे आमदार होण्याची संधी मिळते, अशी काहींची मानसिकता आहे.” यासोबतच, आम्ही उत्तम प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, ‘मी बँकिंग एक्सपर्ट असल्यामुळे मला निवडणुकीतून दूर ठेवले जात आहे,’ या रमेश कत्ती यांच्या वक्तव्याला माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रत्युत्तर दिले. “कोणाचेही असे कोणतेही उद्दिष्ट नाही. त्यांच्यापेक्षा जास्त ‘बँकिंग एक्सपर्ट’ असलेले लोक जगात आहेत.
आम्ही केवळ ९ महिन्यांच्या कार्यकाळात बँकेचा नफा वाढवला आहे. चांगले काम करण्याची बुद्धी माझ्यामध्येही आहे; त्यांनी आधी ते शिकून घ्यावे,” असे जोल्ले म्हणाले. डिसिसी बँक ही शेतकऱ्यांची संपत्ती आहे, यात कोणताही कट किंवा कुतर्क नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे हुक्केरीमध्ये आम्ही लढत देऊ, पण उर्वरित निर्णय मतदारांवर अवलंबून आहे, असे सांगत आमच्यावरील आरोपांना दिवाळीनंतर कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे भालचंद्र जारकीहोळी यांनी शेवटी स्पष्ट केले.


