बेळगाव लाईव्ह : घरबसल्या काम करून भरघोस पगार देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्रातील एका व्यक्तीने बेळगाव जिल्ह्यातील तब्बल ४००० हून अधिक महिलांची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या पीडित महिलांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
बेळगावमध्ये ‘बी.एम. महिला उद्योग समूह’ नावाचा एक गट तयार करून सोलापूर येथील दादासाहेब कोलेकर नावाच्या व्यक्तीने ही फसवणूक केली. स्वतःची ओळख ‘अजय पाटील’ अशी सांगून त्याने बचत गटातील आणि इतर महिलांना लक्ष्य केले. अगरबत्ती पॅकिंगचे काम घरी बसून केल्यास दरमहा निश्चित पगार मिळेल, असे आमिष त्याने दाखवले होते.
आरोपीने अगरबत्ती पॅकिंगसाठी घरी पोहोचवणार असल्याचे सांगून त्यासाठी रिक्षा भाडे किंवा आयडी शुल्क म्हणून प्रत्येक महिलेकडून २५०० ते ५००० रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली. उपलब्ध माहितीनुसार, या व्यक्तीने जिल्ह्यातील ८ हजारहून अधिक महिलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळले. एका ‘आयडी’साठी २,५०० रुपये घेऊन २० दिवसांत ३,००० रुपये देण्याचे तसेच पुढील सहा महिने काम देण्याचे आश्वासन त्याने दिले होते.
अनेक महिलांनी या आमिषाला बळी पडून रक्कम भरली आणि अगरबत्ती पॅक करून दिली. मात्र, २० दिवसांनी पगार मागितल्यावर त्याने टाळाटाळ सुरू केली. नंतर शिवाजीनगर येथील कार्यालय बंद आढळले आणि फोनही स्विच ऑफ झाल्यावर महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अनेक महिलांनी मिळून या योजनेत २ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती, असे एका पीडित महिलेने सांगितले.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडूस्कर याबाबत बोलताना म्हणाले,, “फेब्रुवारी महिन्यात हा गट तयार करून अगरबत्ती, मेणबत्ती पॅकिंगचे काम देतो म्हणून फसवणूक झाली आहे. ५ हजारहून अधिक महिलांची फसवणूक झाली असून त्याच्याविरुद्ध प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

या प्रकरणासंदर्भात शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, “दादासाहेब कोलेकर याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला आहे.”
यावेळी फसवणूक झालेल्या महिलांपैकी सविता सुभेदार, एस. आर. पाटील, उमा बराळे, संजीवनी गायकवाड आदींसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




