Friday, December 5, 2025

/

सहकार, पत्रकारिता आणि राजकारणात ठसा उमटवणारे : नेताजी जाधव

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : समाजाच्या साथीने समाजासाठी जगताना, विविध भूमिकांमध्ये प्रामाणिकपणा आणि साधेपणा जपणारे नेताजी जाधव यांनी नुकताच आपला अमृतमहोत्सव पूर्ण केला आहे. सामाजिक, राजकीय, सहकार आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या जाधव यांच्या जीवनातील आठवणींचा मागोवा त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आला आहे.

शहापूरमधील नवी गल्ली ही नेताजी जाधव यांची ओळख आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांचे वडील नारायणराव जाधव हे कारकून म्हणून नोकरी करताना विनामूल्य लग्न जुळवण्याचे सामाजिक कार्य करत असत. मामा वैजनाथराव शिंदे यांच्यामुळे घरी असलेले राजकीय वातावरण आणि तत्कालीन आमदार बळवंतराव सायनाक यांच्यासारख्या नातेवाईकांमुळे सीमा लढ्याबद्दलच्या चर्चांनी त्यांच्या मनात खोलवर रुजल्या. यामुळेच शिक्षण बाजूला ठेवून ते सामाजिक कार्यात ओढले गेले.

सन १९६५ मध्ये महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चंदगड फाट्यावर बॉक्साईटचे ट्रक अडवण्याच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनात त्यांना अटकही झाली. याच वेळी त्यांची भेट ज्येष्ठ पत्रकार ग. गो. राजाध्यक्ष आणि बाबुराव ठाकुर यांच्याशी झाली. या आंदोलनानंतर त्यांनी अनेक रास्ता रोको आंदोलनातही सहभाग घेत सक्रिय राजकारणाची सुरुवात केली. मॅट्रिकनंतर नोकरी करण्याची गरज असल्याने सुरुवातीला होजिअरी कारखान्यात आणि नंतर मार्केटमध्ये कारकून म्हणून काम केले. हेरवाडकरांच्या लोखंडी दुकानात काम करतानाही त्यांचे मालक त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असत. त्यांच्या मदतीनेच त्यांनी पुढे बेकरीचा व्यवसाय सुरू केला आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली.

 belgaum

व्यवसायातील नेतृत्वामुळे बेळगाव जिल्हा बेकर्स फेडरेशनचे सचिवपद त्यांना मिळाले. त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्याकडे पाठपुरावा करून बेकरी उत्पादनावरील जाचक कर माफ करून घेतला. पुढे ते तुकाराम बँकेचे संचालक आणि चेअरमन झाले. चेअरमनपदाच्या काळात बँकेचा एनपीए (थकबाकी) २२ ते २३ टक्क्यांवरून १२-१३ टक्क्यांवर आणला, ज्यामुळे बँकेला रिझर्व्ह बँकेचे लायसन्स मिळाले आणि नफ्यात वाढ झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बातम्या वृत्तपत्रांना पुरवण्याच्या कामातून ते पत्रकारितेकडे वळले. ‘रणझुंजार’ वृत्तपत्राचे संपादक जयशंकर कालकुंद्रीकर यांच्या सूचनेवरून त्यांनी जनतेच्या समस्यांवर लिहिण्यास सुरुवात केली. महानगरपालिकेच्या बैठकांचा वृत्तांत देणारे ते पुढे ‘अधिकृत पत्रकार’ झाले. त्यानंतर ‘बेळगाव गर्जना’ हे साप्ताहिक त्यांनी दहा वर्षे चालवले आणि पत्रकार विकास ट्रस्टची स्थापना केली.

महानगरपालिकेच्या बैठकीत हजेरी लावणाऱ्या नेताजी जाधव यांनी १९९६ आणि २००४ मध्ये दोनवेळा बेळगाव मनपाचे नगरसेवक म्हणून यश संपादन केले. त्यांनी बॅरिस्टर नाथ पै सर्कल ते खासबागपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि शहापूर पवार गल्लीतील अतिक्रमणे काढून सिमेंट काँक्रिटीकरण केले. “नगरसेवकच आपल्या घरी” या भूमिकेतून त्यांनी घरपोच सेवा दिली. वॉर्डात नेहमी वावरत असल्याने त्यांना समस्यांची कल्पना होती. मराठी अस्मितेला डिवचले गेल्यास सभागृहात प्रभावीपणे प्रत्युत्तर देणाऱ्या जाधव यांना ‘आदर्श नगरसेवक’ म्हणून सन्मान मिळाला. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी विरोधी गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळली.

सामाजिक सलोखा आणि सद्भावना निर्माण करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. शहापूर भागात हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल केलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन एसपी हेमंत निंबाळकर यांनी त्यांचा गौरव केला होता. ‘चलो नागपूर’ आंदोलनाच्या वेळी त्यांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात सहा दिवस राहावे लागले होते. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी ‘कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान’ ची स्थापना केली. या माध्यमातून गरजू विद्यार्थी, अनाथाश्रम यांना मदत, तसेच अल्प दरात चाचण्या उपलब्ध करून देणारी लॅब सुरू केली. नोकरी, व्यवसाय आणि राजकारण या सर्व आघाड्यांवर ते यशस्वी ठरले.

सामाजिक कार्यातून राजकीय आणि सहकार क्षेत्रात यशस्वी झालेले नेताजी जाधव यांचे जीवन म्हणजे केवळ एक प्रवास नसून, ते बेळगावातील निष्ठावान नेतृत्वाचा एक वस्तुपाठ आहे. सीमाभागाच्या लढ्यात त्यांनी दिलेले योगदान, तुकाराम बँकेला प्रगतीपथावर नेण्याची त्यांची धडाडी आणि नागरिकांसाठी त्यांनी नगरसेवक म्हणून केलेले कार्य, हे आजही त्यांच्या अमृतमहोत्सवी प्रवासाची साक्ष देतात. नवी पिढी आणि कार्यकर्त्यांसाठी त्यांचे जीवन नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.