बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या नूतन मध्यवर्तीय बस स्थानकाचे (सीबीटी) चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन झाले असले तरी सदर बस स्थानक हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. परिणामी उद्घाटन झाले असले तरी या बस स्थानकातून अद्याप शहर परिसराची बस सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे सध्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकातूनच शहर परिसरातील बससेवा सुरू आहे.
बेळगाव शहर मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीटी) उद्घाटन झाले असले तरी कंत्राटदाराने हे बस स्थानक अद्याप वायव्य परिवहन महामंडळाकडे हस्तांतरित केलेले नाही.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अपूर्व कन्स्ट्रक्शन या कंत्राटी कंपनीने 2 एकर 19 गुंठे क्षेत्रफळावर 49 कोटी 80 लाख रुपये खर्च होऊन सीबीटी बस स्थानकाची उभारणी केली आहे. तळमजल्यासह तीन मजले असे या बस स्थानकाच्या इमारतीचे स्वरूप आहे.
तळमजल्यावर बसेससाठी एकूण 28 फलाटांची उभारणी करण्यात आली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर व्यापारी गाळे असून तिसऱ्या मजल्यावर वायव्य परिवहन महामंडळाचे कार्यालय आहे या इमारतीत एक्सेलेटर आणि लिफ्टसह आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या इमारतीचे अजूनही शिल्लक असून ते पूर्ण करण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सीबीटी बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले आहे सदर बस स्थानक कार्यान्वित झाल्यास या ठिकाणाहून 1365 बस फेऱ्या सुरू राहणार आहेत.
त्यामुळे सध्या सेवा देणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकावरील ताण कमी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीबीटीचे उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच प्रवासी या बस स्थानकावर येऊ लागले आहेत. तथापि बस सेवा सुरू नसल्यामुळे हिरमोड होऊन त्यांना पुन्हा मध्यवर्ती बस स्थानकाकडे जावे लागत आहे. दरम्यान सीबीटी बस स्थानकावरून बस सेवा सुरू होण्यासाठी अद्याप दहा-पंधरा दिवसांचा कालावधी लागेल असे कळते.


