belgaum

“पुणे साहित्य संमेलनात बेळगावचा काव्यध्वज फडकला!”

0
64
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पुणे येथे पार पडलेल्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील कवी-कवयित्रींनी आपल्या प्रभावी काव्यरचनांनी रसिकांची मने जिंकली. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि सीमाभूमीच्या अभिमानाचा गौरव या काव्य सत्रात अनुभवायला मिळाला.

या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावचे प्रतिनिधित्व उल्लेखनीय ठरले.
रवींद्र पाटील हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले –

“मराठी भाषेचा जागर सीमाभागात सतत होत आहे. मराठी अस्मिता, परंपरा आणि संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे. सीमाभागातील प्रत्येक कवी हा मराठी मातृभाषेचा जागरूक दूत आहे.”

या प्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील अनेक नवोदित आणि प्रगल्भ कवींनी सहभाग नोंदवून आपल्या कवितांमधून मराठी मनाचा ठाव घेतला.
काव्यसत्रात
🎤 प्रा. मनीषा नाडगौडा,
🎤 प्रा. शुभदा खानोलकर,
🎤 अस्मिता आळतेकर,
🎤 रोशनी हुंद्रे,
🎤 किरण पाटील,
🎤 अशोक सुतार,
🎤 डॉ. मयुरी जाधव,
🎤 पूजा सुतार,
🎤 मानसी पाटील,
🎤 श्रीधर बडिगेर,
🎤 परशराम काकतकर
🎤 व्य.कृ पाटील – खानापूर
आदी कवी-कवयित्रींनी आपल्या आशयघन, भावस्पर्शी आणि ओजस्वी कवितांमधून सभागृहात उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 belgaum

त्यांच्या कवितांमधून सीमाभागातील संघर्ष, मातीतली ओल, मराठी अस्मितेचा गंध आणि सामाजिक जाणीव यांचा सुरेख संगम दिसून आला. अनेक ठिकाणी सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमले.

संमेलनाचे अध्यक्ष मा. संतोष नारायणकर, उद्घाटक डॉ. शरद गोरे, आणि आयोजक मंडळातील विजया गायकवाड, सुर्यकांत नामुगडे, दत्तात्रय भोंगाळे, किशोर टिळेकर यांनी या बेळगावच्या कवींच्या सहभागाचे कौतुक केले.

सुत्रसंचालन अमोल कुंभार यांनी ओजस्वी आणि रसाळ शब्दात सत्राचे संयोजन करून कार्यक्रमाला रंगत आणली.

या संमेलनात महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील २०० हून अधिक कवींनी सहभाग नोंदवून मराठी कवितेचा महासोहळा साजरा केला.

बेळगावच्या कवींच्या दमदार सहभागामुळे या संमेलनात सीमाभूमीचा मराठी सूर घुमला आणि मराठी साहित्यातील सीमा विस्तारण्याचा नवा संकल्प पुणे नगरीत व्यक्त झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.