बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. बेळगाव आणि मिरज दरम्यान तात्पुरती धावणारी रेल्वे सेवा हुबळीच्या नैऋत्य रेल्वे विभागाने दिनांक १५-१०-२०२५ पासून कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बेळगावचे लोकसभा सदस्य आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
बेळगाव-मिरज-बेळगाव या रेल्वेचे वेळापत्रक आता निश्चित करण्यात आले आहे. बेळगावहून रेल्वे (क्रमांक: ५१४६१) सकाळी ५:४५ वाजता निघून मिरजेला सकाळी ९:०० वाजता पोहोचेल. त्यानंतर तीच रेल्वे मिरजेहून (रेल्वे क्रमांक: ५१४६२) सकाळी ९:५५ वाजता सुटून दुपारी ०१:१० वाजता बेळगाव येथे परत पोहोचेल. तसेच हीच रेल्वे बेळगावहून (रेल्वे क्रमांक: ५१४६२) दुपारी ०१:३० वाजता निघून मिरजेला सायंकाळी ०४:३० वाजता पोहोचेल. पुन्हा मिरजेहून (रेल्वे क्रमांक: 51441) सायंकाळी ०७:१० वाजता सुटून रात्री १०:२५ वाजता बेळगाव येथे पोहोचेल.
जनतेच्या मागणीनुसार, रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू करण्याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे तसेच नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा केला होता.
या रेल्वे सेवेसाठी त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, बेळगावच्या जनतेने या कायमस्वरूपी रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.




