बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याचाच भाग म्हणून एकाच दिवशी चार स्वतंत्र कारवाया करत मटका जुगार, अवैध दारू विक्री आणि मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मार्केट आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मटका अड्ड्यांवर छापे टाकून जुगार खेळवणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले. मार्केट परिसरातील खंजर गल्लीतून मोहम्मदशफी तहशीलदार, जावेद तहशीलदार आणि जुबेर जिरगा यांना ‘कल्याण मटका’ जुगार खेळवताना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून ₹७,२५०/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. दुसरीकडे, ग्रामीण पोलिसांनी देसूर गावात अनिलकुमार भजंत्री याला अटक करून त्याच्याकडून ₹१,७५०/- रोख रक्कम जप्त केली. या चौघांविरुद्ध केपी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिळकवाडी पोलीस ठाण्याने दोन महत्त्वाच्या कारवाया केल्या. मंगळवार पेठेतील गवळी गल्ली येथे अनिल भवानी आणि आकाश भवानी हे दोघे घरी अवैध दारूची विक्री करत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून ₹३,८४०/- किमतीचे ९० एमएलचे ९६ ‘बंगळूर व्हिस्की’ पाऊच जप्त करण्यात आले. याच भागात कृषी कॉलनी रस्त्यावर संदीप नीलनूर हा आरोपी सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना आढळला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चार प्रकरणांमध्ये पकडलेल्या सात आरोपींकडून एकूण ₹१२,८४०/- रोख रक्कम आणि अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी टिळकवाडी, मार्केट आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.








