बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गटातून निवडून येणाऱ्या 18 सदस्यांपैकी एकमेव मराठी भाषिक सदस्य असलेले माजी आमदार अरविंद पाटील पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून बिन विरोध निवडून गेले आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत मागील टर्म मध्ये माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्याकडून त्यांना कडवी टक्कर मिळाली होती मात्र यंदा चन्नराज हट्टीहोळी यांनी केलेला थोडका संघर्ष वगळता खानापूर तालुक्यातील त्यांना म्हणावा तेवढी टक्कर मिळू शकली नाही त्यामुळे ते पुन्हा एकदा डीसीसी बँकेवर निवडून गेले आहेत.
बेळगाव संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे तसेच राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (BDCC Bank) निवडणुकीत माजी आमदार आणि विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची खानापूर बिनविरोध निवड झाली आहे ही निवड अरविंद पाटील यांच्या भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
रविवार 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत गर्लगुंजी पी.के.पी.एस. चे चेअरमन राजू सिद्धांनी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पाटील यांच्या विरोधात कोणताही उमेदवार शिल्लक न राहिल्याने अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खानापुर शहरात उद्या (13 ऑक्टोबर) भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी खानापुर बसस्थानकापासून ही मिरवणूक सुरुवात होऊन मुख्य रस्त्यांमार्गे विविध भागातून फिरणार आहे.

या प्रसंगी अरविंद पाटील यांचे हारतुरे व पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात येणार असून खानापुर तालुका तसेच आसपासच्या भागातील कार्यकर्ते, सहकारी क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळे आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अरविंद पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे खानापुर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विश्वास त्यांच्या कार्यशैलीचा आणि जनसंपर्काचा पुरावा असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
पाटील यांनी बिनविरोध निवडीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “ही माझ्या सहकारी मित्रांची, कार्यकर्त्यांची आणि जनतेने दिलेली जबाबदारी आहे. सहकार क्षेत्र अधिक बळकट करून शेतकरी व लघुउद्योगांच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे.”
उद्या होणाऱ्या विजयी मिरवणुकीत खानापुर परिसरात उत्सवी जल्लोष पाहायला मिळणार आहे.




