बेळगाव लाईव्ह :पोलिसात तक्रार करून देखील मला मारहाण करणाऱ्यांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसून आता त्यांच्याकडून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे संबंधित 8 जणांना ताबडतोब अटक करण्याचे निर्देश आपण एपीएमसी पोलिसांना द्यावेत, अशी मागणी अझमनगर बेळगाव येथील युवक मोहम्मद जफर अल्लाउद्दीन काझी याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अझमनगर पहिला क्रॉस येथील मोहम्मद जफर अल्लाउद्दीन काझी आणि त्याच्या कुटुंबीयांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हा दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना मोहम्मद काझी याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रकरणातून अलीकडे मोहम्मद याला काही जणांनी जबर मारहाण केली होती.
त्यामुळे डावा हात फ्रॅक्चर होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. मारहाणीच्या घटनेनंतर मोहम्मद काझी याने हल्लेखोराविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी हल्लेखोरांकडून देखील परस्पर विरोधी तक्रार दाखल केली गेली होती.
तथापि तेव्हा मोहम्मद याच्या पहिल्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पोलिसांनी विरोधी गटाच्या तक्रारीवरून कारवाई केली. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेदनेने तळमळत उपचार घेत असलेल्या मोहम्मद याला अटक करून तुरुंगात धाडले. तथापि जेंव्हा न्यायालयासमोर त्याने आपली परिस्थिती सांगितली, तेंव्हा न्यायालयाच्या आदेशावरून त्याला उपचारासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यादरम्यान आरोपीवर अन्य सहकाऱ्यांवर एपीएमसी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. आता त्यांच्याकडून मोहम्मद काझी याच्या मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देणारे संदेश पाठवले जात आहेत. एकंदर माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तेंव्हा कृपया एपीएमसी पोलिसांना माझा पुढील जबाब नोंदवून घेण्याचे आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. न्यायाच्या हितासाठी आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहम्मद जफर ए. काझी याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.




