दिराकडून वहिनीचा चाकूने अमानुषपणे भोसकून खून

0
10
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मालमत्तेसह पैशाच्या वादातून दिराने आपल्या विधवा वहिनीवर हल्ला करून लांब धारदार चाकूने अमानुषपणे पंधरा-वीस वेळा भोसकून तिचा भीषण खून केल्याची घटना आज बुधवारी सकाळी टिळकवाडी येथील मंगळवार पेठमध्ये घडली आहे.

खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव गीता रंजीत गवळी (वय 45) असे आहे. त्याचप्रमाणे खून करणाऱ्या आरोपी दिराचे नाव गणेश गवळी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार पेठ येथील गीता गवळी हिचा पती रंजीत याचे कांही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

पती निधनानंतर काही घरांमध्ये मोलकरणीचे काम करून गीता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. रणजीत गवळी यांच्या निधनानंतर गीता गवळी आणि त्यांच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आरोपी गणेश गवळी यांच्यात सध्या असलेल्या जागेच्या मालकीसंदर्भात वाद सुरू आहे. त्याचप्रमाणे गणेश गवळी याने एका ठिकाणी कर्ज काढले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अलीकडे त्याने जागेच्या वादाचा संदर्भ घेऊन आपली वहिनी गीता गवळी हिच्याकडे पैशाचा तगादा लावला होता.

 belgaum

कर्जाचे पैसे आपल्या दिराने चैनीत उडवले असल्याचे माहित असल्यामुळे, तसेच चार-पाच लाख रुपये देणे शक्य नसल्यामुळे गणेश याला पैसे देण्यास गीता नकार देत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश गवळी याने आज बुधवारी सकाळी आपल्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावणाऱ्या गीता गवळी हिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. प्रथम पाठीत जीवघेणा वार केल्यानंतर किंकाळी फोडून रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या असहाय्य गीताला अमानुषपणे पंधरा-वीस वेळा भोसकल्यामुळे ती जागी गतप्राण झाली.

सदर घटनेनंतर फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. त्याचप्रमाणे मयत गीता हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडण्यात आला. विवाहित मुलगी व तरुण मुलगा अशी दोन मुले असणारी गीता गवळी ही पतीच्या पश्चात स्वतः राबवून आपले घर चालवत होती. त्यामुळे गल्लीतील गवळी समाजासह ओळखीच्या लोकांमध्ये तिच्याबद्दल आस्था व आदराची भावना होती. कोणाच्याही अध्यात मध्यात नसणाऱ्या गीताचा या पद्धतीने भीषण मृत्यू झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर तिच्या नातलग महिला आक्रोश करताना दिसत होत्या.

खुनाच्या घटनेनंतर गीता गवळी हिच्या घराच्या दारात, पायऱ्यांवर रक्ताचा सडा पडल्याचे पहावयास मिळत होते. त्याचप्रमाणे गणेश याने ज्या लांब चाकूने तिला भोसले तो रक्ताने माखलेला चाकू जवळच्या भंगी रस्त्यावरील झुडपात आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार गणेश गवळी याचा टिळकवाडी पोलीस ठाण्यातील रावडी शिटरच्या काळ्या यादीत समावेश आहे.

बेकायदा दारू विक्री करणे, परिसरात गुंडगिरी करणे वगैरे अवैध गोष्टींसाठी गणेश हा मंगळवार पेठ गल्ली परिसरात कुविख्यात आहे. त्याच्या त्रासाला गल्लीतील समस्त रहिवाशी देखील कंटाळले असून गणेशच्या गुंडगिरीला आळा घालावा अशी मागणी त्यांनी यापूर्वी वेळोवेळी टिळकवाडी पोलिसांकडे केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या वहिनीला ठार मारण्याचा कट गणेश याच्या डोक्यात गेल्या कांही दिवसापासून शिजत होता. त्यासाठी काल मंगळवारी त्याने आपल्या कुटुंबाला परगावी धाडून आज सकाळी गीता गवळी हिला अमानुषपणे ठार मारले. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.