बेळगाव लाईव्ह : वजन करताना काटा मारून शेतकऱ्यांचे क्विंटल मागे तब्बल 30 किलो सोयाबीन हडप करणाऱ्या हिरेबागेवाडी येथील व्यापाराचा परवाना रद्द करा, अशी मागणी सोयाबीन भरलेला ट्रॅक्टर घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठणाऱ्या एका संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हिरेबागेवाडी येथील एक व्यापारी सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. वजन काट्यात फेरफार करून सदर व्यापारी प्रतिक्विंटल मागे तब्बल 30 किलो सोयाबीन शिताफिने हडप करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
हा प्रकार आज शुक्रवारी निदर्शनास येताच एका संतप्त शेतकऱ्याने चक्क आपला सोयाबीन भरलेला ट्रॅक्टर घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित व्यापाऱ्यावर ताबडतोब कारवाई करावी, त्याचा व्यापारी परवाना रद्द करावा अशी मागणी जोरदार मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्या शेतकऱ्याने हिरेबागेवाडी येथील तो व्यापारी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहे याची माहिती दिली. शेतकऱ्यांची अशी लूट झाली तर त्याने जगायचे कसे? असा सवालही त्याने केला.


