भाजीपाला एपीएमसीकडे वळवण्या वरून ‘जय किसान’ व्यापाऱ्यांची अधिकाऱ्यांशी खडाजंगी

0
3
Vegetables
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील बहुचर्चित जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटचा व्यापारी परवाना राज्याच्या पणन विभागाकडून रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जय किसान मार्केटकडे भाजीपाला भरून घेऊन येणारी वाहने एपीएमसी भाजी मार्केटकडे वळविण्याच्या अधिकाऱ्यांच्या कृतीला जय किसानच्या व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे उभयतांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाल्याची घटना काल सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर घडली.

बुडा आयुक्तांनी यापूर्वीच जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटचा लँड युज बदल परवाना रद्द केला आहे. त्या पाठोपाठ आता कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार अधिनियम 1966 च्या कलम 72 अंतर्गत राज्याच्या पणन विभागाकडून सदर भाजी मार्केटचा व्यापारी परवाना रद्द करण्यात आला आहे.

 belgaum

यामुळे या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पणन विभागाकडून सदर भाजी मार्केटचा व्यापारी परवाना रद्दचा आदेश जारी होताच पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने काल सोमवारी रातोरात जय किसान भाजी मार्केट जवळील राष्ट्रीय महामार्गावर थांबून बॅरिकेड लावून संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी या मार्केटकडे भाजीपाला भरून घेऊन येणारी वाहने सरकारी एपीएमसी भाजी मार्केटकडे वळवण्यास सुरुवात केली.

याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कृतीस जोरदार आक्षेप घेतला.

संतप्त व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारून शेतकऱ्यांचा भाजीपाला घेऊन येणारी वाहने एपीएमसी भाजी मार्केटकडे वळवण्याचा लेखी आदेश तुमच्याकडे असेल तर दाखवा, अशी विचारणा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करत आहोत कृपया सरकारी कामात अडथळा आणू नका अशी विनंती व्यापाऱ्यांना केली. यावरून उभेतांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. व्यापाऱ्यांनी रस्त्यावरील बॅरिकेड देखील हटवले.

अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका अशी समज व्यापाऱ्यांना देऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दरम्यान जय किसान खाजगी होलसेल मार्केटमध्ये कोणताही व्यापार व्यवहार केला जाऊ नये असा आदेश असताना नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर भाजी मार्केट मधील संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एपीएमसी सचिवांनी केली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.