बेळगाव लाईव्ह : आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी दुर्गा माता दौडला हिरवा झेंडा दाखवला.
या कार्यक्रमात मराठा एलआयआरसीच्या सैनिकांचा आणि कुटुंबियांचा उत्साही सहभाग होता. त्यांनी स्थानिक लोकांसमवेत दुर्गामाता दौडच्या माध्यमातून भक्ती, शिस्त आणि एकता साजरी केली. दौडची सुरुवात मिलिटरी महादेव मंदिराजवळील नुकत्याच नूतनीकरण केलेल्या शिवतीर्थापासून हर हर महादेवच्या जयघोषाने झाली.
बेळगावच्या महत्त्वाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमधून मार्गक्रमण करणाऱ्या या दुर्गामाता दौडमुळे शहर युद्धाला साजेशा उत्साहाने आणि सांस्कृतिक अभिमानाने भरले होते.
मिलिटरी महादेव मंदिरात प्रार्थना करून सुरुवात झालेल्या या दौडच्या स्वरूपातील उत्सवात नवरात्रीच्या समृद्ध परंपरांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच सशस्त्र दल आणि स्थानिक समाजातील मजबूत बंध वाढवला गेला, जो या प्रदेशाचा सामायिक वारसा आणि सुसंवाद प्रतिबिंबित करतो.
मुस्लिम बांधवांकडून कॅम्पमध्ये दुर्गा माता दौडचे उस्फूर्त स्वागत
नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडचे आज बुधवारी सकाळी कॅम्प परिसरातील मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
कॅम्प येथील शरकत पार्क जवळील रस्त्यावर आज सकाळी दुर्गामाता दौडचे मुस्लिम समुदायाच्यावतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यासाठी स्वतः कॅन्टोन्मेंटचे सीईओ विशाल सारस्वत उपस्थित होते. दौडचे आगमन होताच कॅन्टोन्मेंटच्या माजी उपाध्यक्ष डॉ. राहिला साजीद शेख यांनी अग्रभागी असलेल्या भगव्या ध्वजाचे औक्षण केल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजीद शेख आणि सीईओ विशाल सारस्वत यांनी ध्वजाला पुष्पहार अर्पण केला. या खेरीज विशाल सारस्वत यांनी भगवा ध्वज हातात घेऊन कांही अंतर दौड केली. शरकत पार्क नजीक दौडचे आगमन होताच सहभागी सर्वांना फळे, साखर, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करून स्वागत केले गेले.
याप्रसंगी इब्राहिम शेख, वाहिद शेख, जावेद शेख, हकीम निसार मुल्ला, अरफत शेख, श्री कलाई, विजय रायचूरकर, अजीज अब्बासाली, प्रकाश माळवई, गोविंद जवळकर, महादेव मिरजकर, वीणा मिरजकर, साबीर शेख, बाशा शेख, सुजान शेख, इझान शेख, अमीर शेख, प्रतिभा सुळकाई, शाम धनवर, सतीश मन्नूरकर, राघवेंद्र कपलुसकर, शिवप्रसाद आदींसह बहुसंख्य कॅम्पवासीय उपस्थित होते.




