बेळगाव लाईव्ह :गजानननगर उद्यमबाग येथे एका कामगारावर गेल्या शनिवारी घडलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रज्वल आनंद पाटील (रा. कुप्पटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) मयूर कृष्णा गुरव हेब्बाळ (ता. जि. बेळगाव) आणि विशाल वसंत अल्लोळकर (रा. शिवाजीनगर नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगाव) अशी आहेत.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, मूळचे ओडीसा येथील असलेले गजानननगर, उद्यमबाग येथील राजेंद्रकुमार बारीक हे गेल्या शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उद्यमबाग येथील आकार फाउंड्रीज या फॅक्टरीतील आपले काम संपवून आपला मित्र सत्यरंजन बेहरा (रा. हंडेमाळ, गजानननगर उद्यमबाग) याच्या समवेत घरी निघाले होते. त्यावेळी गजानननगर येथे रस्त्यावर मोटरसायकल घेऊन थांबलेल्या दोघा अपरिचितांनी सत्यरंजन याच्यावर हल्ला करून हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर प्रहार केला.
या हल्ल्यात चित्तरंजन गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात राजेंद्रकुमार यांनी उद्यमबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त एन. बी. बरमनी, पोलीस उपायुक्त निरंजन राजेअरस आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक किरण होणकट्टी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथक स्थापण्यात आले होते.
या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत प्रज्वल पाटील, मयूर गुरव व विशाल अल्लोळकर या तिघांना गजाआड केली असून त्यांच्याकडील हल्ल्याच्या वेळी वापरलेली मोटरसायकल व लोखंडी रॉड जप्त केला आहे. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


