बेळगाव लाईव्ह :तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) मंडळाने, अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखाली,बेळगावात नवे श्री वेंकटेश्वर मंदिर बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात 1,000 वेंकटेश्वर मंदिरे उभारण्याच्या टीटीडीच्या व्यापक मोहिमेचा हा एक भाग आहे.
हा निर्णय 16 सप्टेंबर रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत औपचारिकरित्या मंजूर करण्यात आला. मल्लेश्वरम येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत टीटीडी मंडळ सदस्य एस. नरेश कुमार यांनी सांगितले की, बेळगावात होणारे हे नवे मंदिर उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील भक्तांना सोयीचे ठरेल आणि तिरुमलाला जाणाऱ्या लांब यात्रेची गरज कमी होईल.
मंदिरासाठी सुवर्ण सौधाजवळील कोळीकोप्प गावातील सात एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणाची निवड प्रदेशातील रहिवासी व पर्यटकांना सहज पोहोचता यावे म्हणून करण्यात आली आहे.
सुमारे 7.2 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी श्रीवाणी ट्रस्टतर्फे निधी उपलब्ध केला जाणार आहे.
टीटीडी अध्यक्ष बी.आर. नायडू लवकरच बेळगाव येऊन जागेची पाहणी करून प्राथमिक तयारीचा आढावा घेणार आहेत. प्रकल्पाशी संबंधित पुढील कामकाज व वेळापत्रक त्यांच्या भेटीदरम्यान निश्चित केले जाईल, अशी माहिती नरेश कुमार यांनी दिली.



