बेळगाव लाईव्ह: भरधाव ट्रक खाली सापडून एक सायकलस्वार शेतकरी ठार झाल्याची घटना आज सकाळी बेळगाव -राकसकोप रस्त्यावर गणेशपूर शिवम् नगर जवळ घडली. या घटनेनंतर संतप्त बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी मृत शेतकऱ्याचा मृतदेह हलवण्यास विरोध करून रस्त्यावर आंदोलन छेडून रास्ता रोको केला.
मयत दुर्दैवी शेतकऱ्याचे नांव मल्लाप्पा पाटील (वय 70) वर्षे असे आहे. मल्लाप्पा हे आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या सायकल वरून जात असताना एक ट्रक त्यांना चाटून गेला. यावेळी सायकल वरील तोल जाऊन मल्लापा हे थेट त्या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाले. बेळगाव -राकसकोप रस्त्यावर बेनकनहळ्ळी गावानजीक एफसी गोडाऊन हे सरकारी गोदाम आहे.
या गोडाऊन मधून माल भरून घेण्यासाठी येथील बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील मालवाहू वाहने येत असतात. त्यामुळे बेनकनहळ्ळी जवळ बेळगाव -राकसकोप रस्त्यावर रस्त्यावर टेम्पो वगैरेंसह ट्रक, लॉरी यासारख्या 6, 10, 12 चाकी अवजड वाहनांची रांग लागलेली असते.
ही रांग आणि मालवाहतूक करणाऱ्या संबंधित अवजड वाहन चालकांची बेपर्वाई यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच कायम अपघाताची भीती असते. विशेष म्हणजे सदर भागातच बेन्सन स्कूल, संस्कार शाळा व अंगडी कॉलेज या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या मार्गावर विद्यार्थी -विद्यार्थिनींची देखील वहिवाट असते. या खेरीज हा रस्ता अवजड वाहन वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसा प्रशस्त नाही.
त्यामुळे एफसी गोडाऊनकडे येणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध तक्रार करून त्यांच्यासाठी अन्यमार्गाची सोय करावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. याखेरीज बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी गोडाऊन कडे येणाऱ्या अवजड वाहनांच्या विरोधात दोन-तीन वेळा रास्ता रोको आंदोलनही केले होते. तसेच एफसी गोडाऊनकडे येणारी अवजड वाहने बेळगाव -राकसकोप मार्गाऐवजी सुळगा -बॉक्साइट रोड वरून मधुरा हॉटेल मार्गे गोडाऊनकडे वळवावीत अशी मागणी करण्यात आली होती. आज देखील तीच मागणी केली जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांनाच तुम्ही वाहतुकीस अडथळा आणाल तर तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असा दम दिल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर आज ट्रक खाली सापडून मलाप्पा पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन छेडले. मयत शेतकऱ्याचा मृतदेह रस्त्यावरून न हलवता जोपर्यंत एफसी गोडाऊनचे मालक, ट्रक मालक किंवा पोलीस येऊन स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अखेर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांची समजूत काढली. तसेच त्यांना एफसी गोडाऊनच्या मालकाशी चर्चा करून गोडाऊनला येणारी वाहने बॉक्साइट रोड मार्गे वळवण्याचे आश्वासन दिले.
सदर आश्वासनानंतर बेनकनहळ्ळी गावकऱ्यांनी आपले रास्तारोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर मयत शेतकरी मल्लापा पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे हलवण्यात आला. दरम्यान रास्तारोकोमुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा -पाऊण तास ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


