belgaum

तानाजी गल्ली रेल्वे गेट खुले करण्यासाठी नागरिकांचा ‘रेल रोको’

0
94
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील तानाजी गल्ली येथील रेल्वे गेटवरील निर्बंध तातडीने हटवण्यात यावेत, या मागणीसाठी संतप्त स्थानिकांनी आज, सोमवारी दुपारी जोरदार ‘रेल रोको’ आंदोलन केले. रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी येणाऱ्या रेल्वे अडवून आपला तीव्र संताप व्यक्त केला, ज्यामुळे शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

बेळगाव शहरातील तानाजी गल्ली रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, या योजनेला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, तानाजी गल्ली गेटपासून अगदी जवळच कपिलेश्वर उड्डाणपूल आहे, तर दुसऱ्या बाजूला जुन्या पी.बी. रोडवरील उड्डाणपूल उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या उड्डाणपुलाची कोणतीही गरज नाही.

स्थानिकांचा विरोध डावलून प्रशासनाने नियोजित उड्डाणपुलासाठी सदर रेल्वे गेट बंद केले आहे. यामुळे गेटच्या दोन्ही बाजूंच्या स्थानिक रहिवाशांची आणि या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

 belgaum

रेल्वे खात्याच्या या निर्णयाविरोधात स्थानिकांनी यापूर्वी अनेकदा आवाज उठवून रेल्वे गेट बंद न करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेरीस आंदोलनाचे शस्त्र उपसले.

आज, सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे मार्गावर जमले आणि त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी रेल्वे अडवून धरली आणि तानाजी गल्ली रेल्वे गेट तात्काळ पूर्ववत खुले करावे, अशी जोरदार मागणी लावून धरली.

नागरिकांनी अचानक छेडलेल्या या रेल रोको आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, हा प्रकार सध्या बेळगाव शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.