बेळगाव लाईव्ह :राज्यातील सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय लोकतांत्रिक विद्यार्थी संघटनेतर्फे आज आंदोलन छेडण्यात आले.
अखिल भारतीय लोकतांत्रिक विद्यार्थी संघटनेच्या (एड्सो) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे उपरोक्त मागणीसाठी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शनासह आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी हातात संघटनेचा ध्वज व बॅनर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर आंदोलनानंतर राज्यांच्या मुख्य सचिवांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राज्यातील बहुतांश सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता आहे.
सदर महाविद्यालयांना अतिथी प्राध्यापकांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याची गंभीर्याने दखल घेऊन सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची कमतरता ताबडतोब दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


