बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कपिलेश्वर जुन्या तलावातील सापांचा बंदोबस्त करून पाण्यातील त्यांच्या धोकादायक वावराला आळा घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन धामणेकर यांनी केली आहे.
श्री कपिलेश्वर मंदिराच्या जुन्या तलावात सध्या चार-पाच सापांचा वावर आहे. दरवर्षी परंपरेनुसार सदर तलावामध्ये घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आता देखील येथे श्री मूर्तींचे विसर्जन केले जात आहे.
त्यावेळी तलावातील पाण्यामध्ये वावरणारे साप स्पष्टपणे दिसत असल्यामुळे विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्यांच्या मनात कायम अनामिक भीती दाटलेली असते. गंभीर बाब ही म्हणजे काल बुधवारी घरगुती गणपती विसर्जना वेळी एका कार्यकर्त्याला तलावातील सापाने दंश केला.
सर्पदंश झालेल्या त्या कार्यकर्त्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. कपिलेश्वर तलावातील सापांचा धोकादायक वावर लक्षात घेता वरील घटनेची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.









तरी महापौर व महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कपिलेश्वर तलावातील सापांचा बंदोबस्त करून पाण्यातील त्यांच्या धोकादायक वावराला आळा घालण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन धामणेकर यांनी केली आहे.


