बेळगाव लाईव्ह :मोटरसायकल वरून जाणाऱ्या युवकांच्या खिशातून रस्त्यावर पडलेली तब्बल दीड लाखाची रक्कम एका पोलिसाने त्याला सुखरूप परत केल्याची दुर्मिळ प्रामाणिकपणाची घटना काल शहरात घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, बेळगाव उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाय. वाय. तळेवाड हे काल शुक्रवारी रात्री शहरात गस्त घालून आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी रस्त्यावरून आपल्या मोटरसायकल वरून जाणाऱ्या अभिषेक मुचंडी या युवकाच्या खिशातील तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांचा पैशाचा गठ्ठा रस्त्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आजकालची परिस्थिती लक्षात घेता इतकी मोठी रक्कम सहजासहजी हाती लागल्यानंतर कोणाचीही बुद्धी फिरू शकली असती. त्याने ते पैसे हडपले असते.

तथापि रहदारी पोलीस वाय. वाय. तळेवाड यांनी रस्त्यावर पडलेले ते पैसे आपल्या ताब्यात घेऊन अभिषेक मुचंडी यांचा पत्ता शोधून काढला. तसेच संपूर्ण शहानिशा करून त्यांनी सापडलेली दीड लाख रुपयांची रक्कम अभिषेक मुचंडी यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करण्याद्वारे दुर्मिळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
तसेच सगळेच पोलीस कांही पैशाचे लोभी नसतात, बरेच जण अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठही असतात हे देखील दाखवून दिले. आपली हरवलेली मोठी रक्कम सुखरूप परत मिळाल्याने आनंदी झालेल्या अभिषेक यांनी कृतज्ञता व्यक्त करून वाय. वाय. तळेवाड यांचे मनापासून आभार मानले.




