बेळगाव लाईव्ह :बेळगावातील शहापूरचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या बसवान गल्ली येथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी सकाळी या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणी गोळा करण्यासाठी छापलेल्या पावती पुस्तकाचे पूजन केले.
बसवान गल्ली, शहापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या अतिशय जुन्या मंदिराचे बांधकाम काल कालपरत्वे जीर्ण बनले आहे. मंदिराच्या काही भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रशासनाच्या मदतीने या मंदिराचा युद्ध पातळीवर जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी देवीच्या वारादिवशी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी श्री महालक्ष्मी देवी मंदिराला भेट दिली.
यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेण्याबरोबरच जीर्ण झालेल्या मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणी गोळा करण्यासाठी छापण्यात आलेल्या पावती पुस्तकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे पूजन करून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
बेळगाव लाईव्हला माहिती देताना माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी श्री महालक्ष्मी मंदिराला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीबद्दल सांगितले. मंदिरावर नेमण्यात आलेल्या मंदिराच्या प्रशासकांनी छापलेल्या देणगी पावती पुस्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी पूजन केले आहे. तसेच लोकांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जास्तीत जास्त निधी देणगी स्वरूपात द्यावा आणि जीर्णोद्धाराच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे असे सांगून मंदिराचे प्रशासक बेळगावचे आरआय मुगळी यांनी दिलेली 2 हजार रुपयांची देणगी स्वीकारून जीर्णोद्धार निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी सांगितले.

श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी बोलताना सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या तसेच श्री गणेश विसर्जनानिमित्त सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे महाप्रसादाचा स्वयंपाक केला जाणार असून या महाप्रसादासाठी मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, युवक मंडळं आणि गणेशभक्तांनी आपली आर्थिक अथवा धान्य व इतर साहित्य वगैरे शिधा स्वरूपातील मदत उद्या शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मराठा मंदिर येथे जमा करावी, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.






माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी महाप्रसादाचे वाटप उद्या सायंकाळी 7 वाजता शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान आणि धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे केले जाणार असून हा महाप्रसाद पाकीट बंद असेल अशी माहिती दिली. याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंके, माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते.




